काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लग्न समारंभादरम्यान झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटात 63 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 182 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.


या बॉम्बस्फोटाची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे हा स्फोट कुणी घडवला आणि यामागे काय उद्देश होता, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या लग्न समारंभात हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट काबूलवर नेहमीच हल्ले करत असतात. मात्र हा काबूलमधील आजवरच्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक असू शकतो.



लग्नाच्या स्टेजजवळ स्फोट झाला, त्यावेळी तेथे अनेक संगितकार उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात अनेक लहान मुलांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिली आहे.


ऑगस्ट महिन्यातील दुसरा हल्ला


काबूलमधील ऑगस्ट महिन्यातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी 8 ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 145 जण जखमी झाले होते. काबूल पश्चिमेकडे अफगाणिस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हल्लेखोरांनी टार्गेट केलं होतं. यासाठी एका गाडीचा वापर करण्यात आला होता.