काबुल : अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश होता. आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. अफगाणिस्तानमधील आयसीसच्या तळांवर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव केला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात काबुल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेवर मोठा दबाव होता. 


अफगाणिस्तान- पाकिस्तानच्या सीमेवर बॉम्बचा वर्षाव
काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसच्या खोरासन गटाने घेतली होती. हा गट ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, म्हणजे नांगरहरच्या परिसरात अमेरिकेने बॉम्बचा वर्षाव केला आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. 


अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासन)  या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं समजलंय जातं. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय. 


आणखी मोठ्या हल्ल्याची शक्यता 
काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यापेक्षा अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना दिलं आहे. या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा अधिक कडक केली आहे. 
 
संबंधित बातम्या :