काबुल : गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे काबुल विमानतळ हादरुन गेलं होतं. त्यात आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता त्यापेक्षाही अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना दिलं आहे. या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा अधिक कडक केली आहे.
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासन) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं समजलंय जातं. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय.
या दहशतवाद्यांना आम्ही माफी करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने मिशन सुरु केलं असून अमेरिकन लष्कराने काबुल विमानतळाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस या ठिकाणी असलेल्या अमेरिकन लष्करासाठी अत्यंत तणावग्रस्त असणार आहेत.
अमेरिेकेने 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडून जावा अशी अट तालिबानने घातली आहे. काबुल विमानतळ परिसराच्या काही भागावर आपले नियंत्रण असल्याचं तालिबानने जाहीर केलंय.
ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन गुरुवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं. या हल्ल्याची माहिती ब्रिटनच्या गुप्तचर खात्याला मिळाली होती आणि तशी त्यांनी ती इतरांना दिली होती अशी माहिती समोर येत आहे.
तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून हजारो नागरिक आपल्या जीवाच्या भीतीने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व लोकांनी काबुल विमानतळावर एकच गर्दी केली असून या विमानतळाचा ताबा सध्या अमेरिकन सैन्याने घेतला आहे.
संबंधित बातम्या :