काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज (30 एप्रिल) दोन शक्तीशाली स्फोटांनी हादरली. या स्फोटांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला असून 45 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 8 वाजता झाला. एका आत्मघाती बाईकस्वाराने स्वत:ला नॅशलन डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटी (एनडीएस) विभागाच्या बाहेर उडवलं.
20 मिनिटांनंतर त्याच ठिकाणी दुसरा स्फोट झाला. तोपर्यंत तिथे बचावदलाचे जवान आणि कर्मचारी दाखल झाले होते. दुसऱ्या स्फोटात जास्त जीवितहानी झाली असून मृतांमध्ये मीडियाचे प्रतिनिधी आणि एनडीएस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समजतं.
एएफपीचे वरिष्ठ फोटोग्राफ शाह मराई यांचा स्फोटात मृत्यू झाला आहे. हे सगळे पत्रकार रिपोर्टिंगसाठी घटनास्थळी उपस्थित असताना दुसरा स्फोट झाला.
सध्या कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा आत्मघाती हल्ला आहे, असं काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. तर गृहमंत्रालयाच्या प्रवक्ते नजीब दानिश यांनीही हल्ल्याला दुजोरा दिला आहे.