कोलंबो : भारतामध्ये पावसाची वाट पाहणं सुरु असतानाच तिकडे श्रीलंकेत मात्र पावसानं थैमान घातलं आहे. मान्सूननं पहिल्याच पावसामध्ये श्रीलंकेला मोठा तडाखा दिला आहे.
काल (शुक्रवार) श्रीलंकेत तुफानी पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलन यामुळे तब्बल 91 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मुसळधार पावसाने श्रीलंकेतल्या अनेक शहरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पाणी साचल्यानं बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. पुरामध्ये अडकलेल्यांना वायुसेना आणि नौदलाच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
या पावसानं 8000 पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे श्रीलंकेत थैमान घालणारा पाऊस आगामी काळात भारताकडे सरकल्यानंतर कसा बरसतो, याकडेच आता सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
दरम्यान, श्रीलंकेला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय नौदलाने बंगालच्या खाडीत असलेली आपली युद्धनौका आयएनएस किर्च ही कोलंबोच्या दिशेने रवाना केली आहे.
या युद्धनौकेद्वारे पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. शिवाय औषधे, कपडे, आणि पिण्याचं पाणीही पाठवण्यात आलं आहे.