ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये शुक्रवारी (15 मार्च) झालेल्या हल्ल्यानंतर तेथील 9 भारतीय/भारतीय वंशाचे नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात 49 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 40 हून अधिक नागरिक जखमी आहेत.
या हल्ल्यानंतर 9 भारतीय बेपत्ता असल्याची माहिती न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त संजीव कोहली यांनी दिली आहे. न्यूझीलंडमधील हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं कोहली यांनी म्हटलं आहे.
आमचे अधिकारी न्यूझीलंडमधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ही अत्यंत संवेदनशील घटना आहे. त्यामुळे आम्ही सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाही, मात्र अधिकृत माहिती मिळाल्यानंतर याबद्दल स्पष्ट करु, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
एक भारतीय जखमी झाल्याची माहिती
अहमद जहांगीर हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जहांगीर यांना गोळी लागली असल्याची माहिती हैदराबादमध्ये राहणारे त्यांचे भाऊ इकबाल यांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर ख्राईस्टचर्चमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान इकबाल यांना न्यूझीलंडला जाण्यासाठी मदत करण्याचं आवाहन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केलं आहे.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, न्यूझीलंडच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
हल्लेखोर अटकेत
49 नागरिकांचा जीव घेणारा मुख्य हल्लेखोर बेंटन हॅरिसन टॅरेंटसह चार हल्लेखोरांना पोलिसांनी काल अटक केली होती, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या चारही हल्लेखोरांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने सर्वांची कारागृहात रवानगी केली आहे. हॅरिसन टॅरेंटने हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओही बनवला होता.
अलनूर आणि निनवूड या मशिदींवर हल्ला
न्यूझीलंडमधील अलनूर आणि निनवूड या दोन मशिदींमध्ये चार हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. पाश्चिमात्य देशातील सर्वात मोठा मुस्लीमविरोधी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.
बांगलादेशचा क्रिकेट संघ मायदेशी परतला
गोळीबार झाला त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं आहे. बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. आज (शनिवारी) दोन्ही संघामध्ये तिसरा कसोटी सामना ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आला आहे.