इस्लामाबाद : पाकिस्तानी न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे प्रमुख आणि वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तान दिल्लीवर पाच मिनिटांत निशाणा साधू शकला असता, असा दावा केला आहे. शनिवारी झालेल्या एका सभेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
"आमच्या देशाने कहूटामधून अवघ्या पाच मिनिटांत दिल्लीला लक्ष्य केलं असतं. आम्ही 1984 मध्येच अणूचाचणी करण्याच्या उद्देशाने एक कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, तत्कालीन सरकारकडून परवानगी न मिळाल्याने तो रद्द करावा लागला." असंही कादिर म्हणाले.
"1984 मध्येच आम्ही अण्वस्त्रसज्ज झालो होतो. अणूचाचणीची तयारी केली होती. मात्र, तत्कालीन जिया-उल-हक सरकारने याला विरोध केला. तसं केल्यास अफगाणिस्तानातील रशियाच्या घुसखोरीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला मिळणारी आर्थिक रसद बंद होईल, असे कारण जनरल जियांनी दिले होते. जर त्यावेळीच आम्हाला परवानगी मिळाली असती, तर रावळपिंडीच्या कहूटामधून पाचच मिनिटांत दिल्लीला लक्ष्य केले असते" असा दावा अब्दुल कादिर यांनी केला.
पाकिस्तानने 28 मे 1998 साली बलुचिस्तान प्रांतातील चागाई भागात अणूचाचणी केली होती. याच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी इस्लामाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.