लंडन : ब्रिटनमधील 69 वर्षांचे रॉन शेफर्ड लग्नाच्या तयारीला लागले आहेत. 69 व्या वर्षी बोहल्यावर चढणारी व्यक्ती पाहून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. पण हे रॉन यांचं पहिलं-दुसरं नाही, तर नववं लग्न ठरलं असतं. 'असतं!'... कारण त्यांची 28 वर्षीय वधूच पळून गेली आहे.


समरसेटमधील योविलमध्ये राहणाऱ्या 69 वर्षीय रॉन शेफर्ड यांची आठ लग्नं झाली आहेत. त्यापैकी एकही यशस्वी ठरु शकलं नाही. नुकतीच रॉन यांची ओळख 28 वर्षाय क्रिस्टल लॅलकशी झाली. दोघांचं प्रेम जुळलं. आपलं उर्वरित आयुष्य क्रिस्टलसोबत व्यतीत करण्याचा निर्धार त्यांनी केला.

सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या रॉन यांचा फुगा फुटला. लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच ती सामान घेऊन परागंदा झाली. तिचं दुसऱ्याच तरुणावर प्रेम असल्याचा संशय रॉन यांना आहे. त्यामुळे त्यांनी गर्लफ्रेण्डविरोधात पोलिसात धाव घेतली.

क्रिस्टलने काहीच दिवसांपूर्वी रॉन यांनी दिलेली अंगठी हरवल्याचा बनाव केला होता. तेव्हापासूनच आपला संशय बळावल्याचं रॉन सांगतात.

1966 मध्ये रॉन यांचं पहिलं लग्न मार्गारेटशी झालं. तिच्यापासून त्यांना तीन मुलं झाली. मात्र दोन वर्षात दोघं विभक्त झाले.