न्यूयॉर्क : फोर्ब्स मॅगझिनने अमेरिकेतील टॉप-400 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतीय वंशाच्या श्रीमंतांचाही समावेश आहे. 400 श्रीमंतांच्या यादीत एकूण 5 भारतीय वंशाच्या अमेरिकन श्रीमंतांचा समावेश आहे.
फोर्ब्सच्या '2016 मधील अमेरिकेतील सर्वात श्रीमंतां'च्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सलग 23 व्यांदा पहिल्या स्थआनावर आहेत. तर या यादीत सिंफनी टेक्नॉलॉजी समूहाचे रमेश वाधवानी, आऊटसोर्सिंग फर्म सिनटेलचे सहसंस्थापक भरत नीरज देसाई, हवाई क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्योगपती जॉन कपूर आणि सिलिकॉन व्हॅलीमधील गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम या भारतीय वंशाच्या अमेरिकन श्रीमंतांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे वाधवानी हे या यादीत 222 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर एवढी आहे. त्याचप्रमाणे 2.5 अब्ज डॉलर संपत्ती असेले देसाई 274 व्या स्थानावर आहेत. तर 2.2 अब्ज डॉलर संपत्ती असलेले गंगवाल 321 व्या स्थानावर आहे. कपूर यांची संपत्ती 2.1 अब्ज डॉलर असून, ते 335 व्या स्थानावर आहेत, तर श्रीराम हे 361 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 1.9 अब्ज डॉवर एवढी आहे.