Kabul Bomb Blast : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधील (Kabul) एका शाळेत आज बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात जवळपास 23 विद्यार्थ्यांचा मृत्या झालाय. आज सकाळी हा बॉम्बस्फोट झालाय. तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी याबाबची माहिती दिली आहे. या स्फोटात 30 च्या आसपास लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सीएनएनने याबाबचे वृत्त दिले आहे.
बॉम्बस्फोट झाला त्यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश परीक्षा देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी या विद्यार्थ्यांमध्ये येत एका दहशतवाद्याने स्वत:ला उडवून दिलं. यात 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर शिक्षकांसह 30 लोक जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ज्या शाळेत बॉम्बस्फोट झाला त्या शाळेतील एका शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की, वर्गात मारल्या गेलेल्या मुलांचे हात-पाय अस्तव्यस्त पडले होते. सर्वत्र रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडले होते. आम्ही स्वतःच्या हातांनी मुलांचे हातपाय गोळा केले. फरशी रक्ताने माखलेली होती. बॉम्बस्फोटानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बहुतांश विद्यार्थी हे हजारा आणि शिया धर्माचे होते. हजारा हा अफगाणिस्तानातील तिसरा सर्वात मोठा वांशिक धर्म आहे. ज्या भागात हा स्फोट झाला तो शिया-मुस्लिमबहुल भाग असून, तिथे अल्पसंख्याक हजारा समाज राहतो. या स्फोटादरम्यान विद्यार्थी या कोचिंग सेंटरच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत होते. यावेळी हल्लेखोरोने स्वतःला आत्मघाती बॉम्बने उडवले.