Pakistan Train Accident : पाकिस्तानातील (Pakistan) रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले आहेत. कराची पासून 275 किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची (Accident) तीव्रता इतकी भीषण होती की आतापर्यंत या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास 80 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्या लोकांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.
अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट
या अपघाताची तीव्रता जास्त जरी असली तरी या अपघातामगाचं नेमंक कारण अद्याप अस्पष्टच आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफीक यांनी हा अपघात कोणीतरी मुद्दाम घडवून आणल्याचा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच त्यांनी तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु याचे ठोस कारण अजूनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्करी पथक देखील बचावकार्यात सहभागी झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प असून रुळावरुन डबे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
ज्या रेल्वेचा अपघात झाला ती रेल्वे वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या अपघातातून बचावली होती अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या 100 पेक्षा अधिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. तर नागरिकांना खाण्यापिण्याची सोय देखील करण्यात येत आहे. दरम्यान सिंध प्रांतातील प्रत्येक रुग्णालयात आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश देखील दिले आहेत. पण सध्या पाकिस्तानच्या रेल्वे अपघातामध्ये वाढ झाल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच यावर पाकिस्तानच्या सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.