कॅलिफोर्निया : नजर पोहोचत नाही एवढा उंच,  डोळ्यात सामावत नाही एवढा मोठा घेर आणि माणसाच्या शेकडो पिढ्या डोळ्यासमोरुन भराभर निघून जाव्या एवढं मोठं आयुष्य.. पायोनिअर केबिन ट्री, हा होता कॅलिफोर्नियाच्या जंगलातील भीष्मपितामह…एक पुराणपुरुष.

मात्र रविवारी रात्रीच्या वादळी पावसाने या हजार वर्षांच्या पुराणपुरुषाच्या पायाखालची माती सरकली आणि हजारो टन वजनाचं हे पायोनिअर केबिन ट्री जमीनदोस्त झालं.



अवाढव्य वाढणारं कोस्ट रेडवूड जातीचं हे झाडं, जगात फक्त कॅलिफोर्नियातच आढळतं. अवाढव्य झाडांची महिमा जगभर पसरल्यानंतर पर्यटक इथे भेटी देऊ लागले. 1931 साली 2630 हेक्टर परिसरात पसरलेल्या या जंगलाला स्टेट पार्कचा दर्जा मिळाला. केलावेरीज बिग ट्री स्टेट पार्क असं याचं नामकरण करण्यात आलं.

या झाडाला पायोनिअर केबिन ट्री किंवा द टनल ट्री असंही म्हटलं जायचं.


याची उंची तब्बल 250 मीटर होती. 


33 फूट म्हणजेच जवळपास 10 मीटर एवढा याचा घेर होता.


137 वर्षांपूर्वी या झाडाचं खोड गोल आकारात कोरण्यात आलं.


झाडामधून कोरलेल्या जागेत रस्ता होता, जिथून चारचाकी गाड्या सहज जायच्या.


 

या जंगलात भव्य आकाराची दोन झाडं होती. पहिलं झाडं ज्याला मदर ट्री म्हटलं जायचं ते 1960 च्या पुरात कोसळलं. महत्त्वाचं म्हणजे ते झाड पायोनिअर केबिन ट्रीपेक्षाही दोन पटीने मोठं होतं. यानंतर स्थानिक लोकांनी मिळून केलावेरीज सोसायटी तयार केली. झाडांचं जतन सुरु केलं. मात्र पिकलं पान, कधी तरी गळणारच ना.



पायोनिअर कॅबिन ट्रीभोवती नेहमी पर्यटकांचा गराडा असायचा, याचा अंगा-खांद्यावर फोटो काढण्यासाठी रांगा लागायच्या. अख्खं आयुष्य पर्यटकांमध्ये घालवलेल्या या पुराणपुरुषाचा अखेर मात्र  एकांतात झाला. कदाचित पोरांना आपल्या अंगाखाली चिरडण्याचं दु:ख या बापाला सहन झालं नसतं…