इस्तांबुल: तुर्कस्तानच्या समुद्र किनाऱ्यावर 2015 मध्ये सिरीयामधील एक लहानगा अयलान कुर्दीचा मृतदेह पाहून अनेकांना धक्का बसला होता. सप्टेंबर 2015मध्ये देशात सुरु असलेल्या गृहयुद्धामुळे अयलान आणि त्याच्या कुटुंबियांना देश सोडून परांगदा व्हावे लागले. पण त्यातच अयलानला आपला जीव गमावावा लागला. असाच प्रकार म्यानमारमध्ये सुरु असून, यामध्ये 16 महिन्यांच्या एका चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला.
या चिमुकल्याचे नाव मोहम्मद शोहयात असे असून, शोहयात आपला कुटुंबियांसोबत म्यानमार सोडून बांग्लादेशात जात असताना त्याला जीव गमावावा लागला.
सध्या म्यानमारमधील सैन्यदल रोहिंग्या समुदायातील नागरिकांना त्रास देत आहे. त्यामुळे रोहिंग्या समुदायातील नागरिक देश सोडून परागंदा होत आहेत. यामध्ये मोहम्मद शोहयात आपली आई आणि भावांसोबत नावेतून नाफ नदी पार करत होते. त्यावेळी नाव नदीत पलटल्याने, नावेतील सर्व प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. यातीलच मोहम्मदचा मृतदेह नदी किनाऱ्यावरील चिखलात आढळला.
मोहम्मदचे वडील जफर आलम बांग्लादेशात पोहचल्यानंतर मोहम्मदच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचा आक्रोश सुरु आहे. म्यानमारमधील रोहिंग्या समाजावर होत असलेल्या अन्यायावर त्यांनी लक्ष वेधले असून, जगाने रोहिंग्या समाजाच्या व्याथा जाणून घेतल्या पाहिजेत असे आवाहन केले आहे.
सध्या म्यानमारमध्ये त्यांच्या गावात हेलिकॉप्टर्सने गोळ्यांचा वर्षाव केला जात असून, रोहिंग्या समुदायातील जनतेचे हत्याकांड सुरु असल्याची माहिती त्यांनी सीएनएनला दिली.