नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मूलभूत नागरी सुविधांकरिता विशेष अनुदान योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजना व श्यामाप्रसाद मुखर्जी योजनांमधून निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज दिल्या. कामठी तालुक्यातील विविध गावांतील सुमारे 5 कोटी 50 लक्ष निधीतून होणाऱ्या विकासकामांचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, समाज कल्याण सभापती नेमावली माटे, जि.प. सदस्य अंवतिका लेकुरवाळे, सरपंच वनिता इंगोले, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते. विशेष अनुदान योजनेंतर्गत बिडगाव जिजामाता नगर, आराधना नगर 30 लक्ष निधीतून रस्त्याचे बांधकाम, तरोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली बांधकाम, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेंतर्गत 16 लक्ष 17 हजार निधीतून जलशुध्दीकरण संयत्र व शाळेच्या खोलीचे लोकार्पण, तसेच 36 लक्ष रुपये निधीतून टेमसाना येथील जलशुध्दीकरण केंद्र, भक्त निवास, अंगणवाडी बांधकाम, केम येथील जलशुध्दीकरण केंद्र, जिल्हा परिषद शाळा वर्गखोली, शामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत 60 लक्ष रुपये निधीतून शिवणी व चिखली येथील शॉपिंग कॉम्पलेक्स आदींचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी झाले.


त्याचप्रमाणे 30 लक्ष रुपये निधीतून भूगाव येथील शॉपिंग कॉम्पलेक्स, 10 लक्ष रुपये निधीतून नान्हा मांगली येथील क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत यात्री निवास, 10 लक्ष निधीतून जाखेगाव येथील यात्री निवास, 16 लक्ष 17 हजार निधीतून आसलवाडा गावातील जलशुध्दीकरण केंद्र व वर्गखोली, दोन कोटी 25 लक्ष निधीतून अंबाडी येथील स्पोर्ट कॉम्पलेक्स, वेअर हॉऊस, सामुहिक प्रशिक्षण केंद्र तसेच 37 लक्ष निधीतून वडोदा येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, माताबाल संगोपन उपकेंद्र व वर्गखोली आदींचे भुमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.


विकासकामे मुदतीत पूर्ण करावीः केदार


ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मूलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्तेनिर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. इतरही आवश्यक रस्ते सुधारणेच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही केदार यांनी दिली. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होत असल्याने रोगांना आळा घालण्यासाठी त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याच्या टाकींची स्वच्छता, आरोग्यकेंद्रात पुरेसा औषधींचा साठा व अंगणवाडीत बालकांसाठी पोषण आहार आदी महत्वपूर्ण बाबी प्राथम्याने पूर्ण ठेवाव्यात, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.