भगवानगड वाद : पंकजा मुंडेंची माघार म्हणजे राजकीय खेळी : नामदेव शास्त्री
गोविंद शेळके, एबीपी माझा | 29 Apr 2017 11:12 AM (IST)
अहमदनगर : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंनी माघार घेतली असली तरी यात मोठी राजकीय खेळी असल्याचं महंत नामदेव शास्त्रींनी म्हटलं आहे. भगवानगडाच्या विकासासाठीच आम्ही गादीवर बसलो आहोत. किर्तनकाराशिवाय भगवानगडावर कोणाचाच आवाज निघणार नाही, असे नामदेव शास्त्री यांनी ठणकावले. पंकजा मुंडे यांना सौजन्यानं वागायचे असेल, तर त्यांनी आपण गडावर भाषण करणार नाही, असं जाहीर करावं. तेव्हाच हा वाद मिटेल, असंही नामदेव शास्त्रींनी म्हटलं आहे. “माझ्याविरोधात भाष्य करण्याची खोतकर आणि जाणकरांची लायकी नाही. संसारातली ही माणसं, सत्तेचा हव्यास असलेल्यांची महंत लोकांविषयी बोलण्याची लायकी नाही.”, असा पलटवारही नामदेव शास्त्रींनी केला. गेल्यावर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभारलं. तेव्हापासून महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील दरी वाढत गेली आहे.