Ratan Tata  : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. त्यामुळेच रतन टाटा लोकांच्या मनावर राज्य करतात. काल आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना ते कमालीचे भावूक झाले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं. आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली आहेत, असं रतन टाटा यावेळी म्हणाले. आसाममधील 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचे (cancer Hospital) उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली असली तरी त्यामागे एक मोठे कारण आहे. 
 
आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी टाटांनी यापूर्वी देखील अनेक प्रयत्न केले आहेत. गरिबांच्या हिताचा विचार टाटा समूहाने नेहमीच केला आहे. मुंबईतील परळ येथे असलेल्या टाटा मेमोरियल सेंटरचे आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. हे केंद्र सुरू होण्यामागेही एक रंजक कथा आहे. 




लेडी मेहेरबाई टाटा यांचे 1932 मध्ये रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले. यानंतर त्यांचे पती दोराबजी टाटा यांनी त्यांच्या पत्नीला परदेशी रुग्णालयात ज्या सुविधा दिल्या होत्या त्याच सुविधांनी भारतात रुग्णालय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. दोराबजी टाटांच्या मृत्यूनंतर हे स्वप्न साकार करण्यासाठी नौरोजी सकलतवाला यांनी प्रयत्न केले. मात्र, जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नानंतर टाटा मेमोरियल सेंटरचे स्वप्न साकार झाले. 1957 मध्ये ते आरोग्य मंत्रालयाने ताब्यात घेतले. परंतु, जेआरडी टाटा आणि होमी भाभा यांनी त्याच्या कामकाजावर लक्ष ठेवले. सुमारे 80 खाटांपासून सुरू झालेले हे रुग्णालय आज 600 हून अधिक खाटांचे आहे. पूर्वी ते 15 हजार चौरस मीटरमध्ये होते, आता ते 70 हजार चौरस मीटरवर पोहोचले आहे. या रूग्णालयात आज जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात.






टाटा मेडिकल सेंटर
टाटा मेडिकल सेंटर हे रतन टाटा यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा जिवंत पुरावा आहे. टाटा मेडिकल सेंटर हे कोलकात्याच्या बाहेर राजारहाट भागात आहे. 16 मे 2011 रोजी रतन टाटा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रात विशेषत: गरीब लोकांसाठी कर्करोगावर उपचार केले जातात. मात्र, येथे इतर लोकांवरही उपचार केले जातात आणि त्यातून मिळणारे पैसे टाटा मेडिकल सेंटरमध्ये गरिबांच्या उपचारासाठी वापरले जातात. टाटा मेडिकल सेंटरमध्ये  जवळपास 300 बेड आहेत, त्यापैकी निम्म्या खाटा गरीब लोकांच्या उपचारासाठी राखीव आहेत. टाटा मेडिकल सेंटरचा संपूर्ण खर्च धर्मादाय संस्थेकडून मिळणाऱ्या पैशातून केला जातो. टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या माध्यमातून केंद्राचे व्यवस्थापन केले जाते.


रतन टाटा यांनी आरोग्य आणि फिटनेस स्टार्टअप क्युरफिटमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील असून आता आयुष्यभर त्यांना केवळ आरोग्यासाठीच काम करायचे आहे. ते म्हणतात की, आरोग्यसेवा तंत्रज्ञानामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. टाटा ट्रस्ट गावोगाव आरोग्य सुविधा पुरवण्यात गुंतले आहे.  


महत्वाच्या बातम्या


Ratan Tata : रतन टाटा कमालीचे भावूक; आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगताना म्हणाले...