मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेतृत्त्वाकडून लवकरच  कायमचे दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर रिक्त असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता देवेंद्र  फडणवीस भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (BJP National President)


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी जाहीररीत्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. मात्र, सध्या तुम्ही काम सुरू ठेवा, काही दिवसांनी याबाबत आपण निर्णय घेऊ, असा निरोप अमित शाह यांच्याकडून देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांची अनेकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबते झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या सगळ्या भेटीगाठींनंतर झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांना आता राज्यातून देशपातळीवर काम करण्याची संधी देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.


मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवले जाणार का, याबाबत अद्याप साशंकता आहे. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा आणि ताकद असल्याने ते मोक्याच्या क्षणी दिल्लीत गेल्यास विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यात असणारी प्रचंड गुणवत्ता, क्षमता आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करता त्यांना आत्ताच दिल्लीत बोलावणे फायदेशीर ठरु शकते, असाही एक मतप्रवाह आहे. 


देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य चेहरा का?


देवेंद्र फडणवीस हेच सध्याच्या घडीला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य चेहरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातही उत्तम संबंध आहेत.


लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला पुरेशी मदत केली नसल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे जे.पी. नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर भाजप आणि संघात एकमत होऊ शकले नव्हते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोघांपैकी कोणाचाही आक्षेप नसल्याचे सांगितले जाते. फडणवीसांच्या राजकारणाची एकूण पद्धत लक्षात घेता ते  आगामी काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  आणि भाजपमध्ये योग्य तो समन्वय ठेवून राजकारण पुढे नेऊ शकतात. याच गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोस्ट सुटेबल कँडिडेट मानले जात आहेत. 


विधानसभा निवडणुकांपूर्वी नेतृत्त्वबदल करण्याची मोदी-शाहांची स्टाईल


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपची धुरा हाती घेतल्यापासून कायमच धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडताना मोदी-शाहांच्या जोडगोळीने कोणालाही अपेक्षा नसलेल्या चेहऱ्यांची निवड केली होती. 2014 मध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना डावलून मोदी आणि शाह यांनी अशाचप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले होते. त्यानंतर अलीकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करताना अनपेक्षित चेहऱ्यांना संधी दिली होती.


याशिवाय, गेल्या काही वर्षांमध्ये अँटी-इन्कम्बन्सीचा धोका टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक राज्यांमध्ये नेतृत्त्वबदल केला होता. त्रिपुरा, हरियाणा, कर्नाटक या राज्यांमध्ये प्रस्थापित भाजप नेतृत्वाबद्दल असलेली नाराजी लक्षात घेऊन भाजपने मुख्यमंत्री बदलले होते. सध्या महाराष्ट्रातही विरोधकांच्या टीकेचा मुख्य रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती लयाला गेली, असा प्रचार सातत्याने विरोधकांकडून केला जातो. याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांना मोठ्याप्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन  मोदी-शाह  यांच्याकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणून भाजप विरोधी वातावरणाची धग कमी केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्यात ठासून भरलेली गुणवत्ता राष्ट्रीय पातळीवर भाजपसाठी फायदेशीर


अलीकडच्या काळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वासमोर अनेक आव्हानं निर्माण झाली असली तरी त्यांच्यात ठासून भरलेली गुणवत्ता, अभ्यासू वृत्ती आणि कार्यक्षमता हे त्यांचे गुण विरोधकही मान्य करतील. या सगळ्या बाबींचा विचार करता भविष्यात भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेता किंवा मंत्री होण्याची पुरेपूर क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संघटना बांधणीचे आणि राजकीय संकटांतून मुत्सद्दीपणे मार्ग काढण्याची क्षमता आहे. याचा फायदा भाजपला राष्ट्रीय स्तरावर करुन घेता येऊ शकतो. तसेच देवेंद्र फडणवीस यांना अर्थकारण आणि त्याच्याशी निगडीत बाबींची सखोल जाण आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत ही देवेंद्र फडणवीस यांची जमेची बाजू ठरते. कारण, पक्षीय आणि निवडणुकीच्या काळातील राजकारण संपल्यानंतर सरकार चालवताना अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणि प्रशासकीय मर्यादा लक्षात घेऊन जे निर्णय घ्यावे लागतात, ते घेण्याची क्षमता फार मोजक्या नेत्यांमध्ये असते. अन्यथा कितीही मोठा राजकीय नेता असला तरी आर्थिक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी त्याला सचिव किंवा सरकारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना अर्थकारण आणि प्रशासनाची पुरेपूर जाण असल्याने ते स्वत:ला हवी असलेली धोरणे आणि सुधारणा प्रभावीपणे राबवू शकतात.  एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची सकारात्मक बाजू आणि परिणाम प्रसारमाध्यमांसमोर मांडण्याची हातोटीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर  भाजपचे नेतृत्व कोण करणार, अशा प्रश्न विचारल्यास जी काही मोजकी नावं डोळ्यांसमोर येतात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेता आतापासूनच देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रीय नेता म्हणून ग्रुमिंग केल्यास पुढील काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपसमोरील आव्हाने परतवण्यात देवेंद्र फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच अलीकडच्या काळात कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायची, मग त्यासाठी तोडफोडीचे राजकारण असो किंवा अन्य कोणताही मार्ग असो, ही सध्याच्या भाजप नेतृत्त्वाची शैली देवेंद्र फडणवीस यांनाही पुरेपूर अवगत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रभावीपणे राजकारण केले आहे. उत्तरेतील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आक्रमक राजकारण यश मिळवता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे ते भविष्यात राष्ट्रीय स्तरावर भाजपला अपेक्षित असलेले आक्रमक राजकारण पुढे नेण्यासाठी योग्य नेता असल्याचे सांगितले जाते. 


आणखी वाचा


महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य