Wasim Akram: पाकिस्तान क्रिकेट संघाजा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमचा एक फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे वसीम अक्रमचा हाच फोटो पत्नी शनिराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वसीम अक्रमच्या या फोटोवरुन सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. 


वसीम अक्रम (Wasim Akram) आणि पत्नी शनिरा यांनी 19 ऑगस्ट रोजी लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने शनिराने 'एक्स'वर वसीम अक्रमचा एक फोटो शेअर केला. एक्सवर फोटो शेअर करत तिने वसीम अक्रमला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यामध्ये एक ट्विस्ट होता. शनिराने फोटोशॉप करत वसीम अक्रमला टक्कल आणि दाढी असलेलं दाखवलं. 






शनिरा काय म्हणाली?


शनिराने फोटोसह कॅप्शन देतानाही उपहासात्मकपणे म्हणाली की, 11 वर्षानंतरही आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी दिसलास तितकाच हँडसम दिसतोस...शनिरा वसीम अक्रमची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी हुमाचं 2009 मध्ये निधन झालं होतं. त्यांतर शनिराने आणखी एक फोटो शेअर केला. ठीक आहे, इथे मी तुझ्याशी चांगली वागेन. हा सध्याचा फोटो....माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. तू कसा दिसतोय याने फरक पडत नाही, पण चेहऱ्यावरील हे हास्य कायम राहावं, असं ती म्हणाली आहे.






वसीम अक्रमची कारकीर्द-


वसीम अक्रमने पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 1984 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. वसीम अक्रमने 1985 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामनाही खेळला. वसीम अक्रमने 104 कसोटी सामने आणि 356 एकदिवसीय सामने खेळले आहेत. वसीम अक्रमने कसोटी सामन्यात 414 आणि एकदिवसीय सामन्यात 502 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रमच्या नावावर एकूण 916 विकेट्स आहेत.


चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वसीम अक्रम काय म्हणाला?


बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारत पाकिस्तानात नक्कीच येईल, असा विश्वास पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने व्यक्त केला आहे. मला आशा आहे की भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येईल. संपूर्ण देश इतर सर्व संघांच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे आणि भारतीय संघाचे भव्य स्वागत केले जाईल, असंही वसीम अक्रम यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी मैदान सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये स्टेडियमचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती देखील वसीम अक्रम यांनी यावेळी दिली.


संबंधित बातमी:


...त्यामुळे हार्दिक पांड्या अन् नताशाच्या आयुष्यावर मोठा परिणाम; घटस्फोटाचं अखेर कारण आलं समोर!