Washim News : "माझ्या नाही त्यांच्या विचारात फरक पडला. आम्हाला दूर केलं नसतं तर 12 खासदार आणि 40 आमदार दूर गेले नसते. चुकलं कोण याचं आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे," अशा शब्दात यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तब्बल वर्षभरानंतर खासदार भावना गवळी वाशिममध्ये (Washim) पोहोचल्या आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची आज वाशिममध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या शक्तिप्रदर्शनाच्या आधी एबीपी माझाने भावना गवळी यांच्याशी बातचीत केली आणि ईडी कारवाई, उद्धव ठाकरे याबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी आपल्यात काहीही फरक पडला नसल्याचं सांगितलं.  


शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी या शिंदे गटात सामील झाल्या. जवळपास वर्षभरानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचं मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या. 


एबीपी माझाचे प्रश्न आणि भावना गवळी यांची उत्तरं


1. तुम्ही म्हणता तुमच्यात फरक पडलेला नाही मग फरक पडला कुठे?
फरक कुठेतरी पडला होता म्हणूनच असं झाले आहे. तो फरक झाला नसता, आम्हाला दूर केलं नसतं. तर 12 खासदार आणि 40 आमदार दूर गेले नसते. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनता ही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकलं कोण? याचं आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे.


2. उद्धव ठाकरे भेटत नव्हते फक्त एवढीच नाराजी होती की त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक पडला होता ही नाराजी होती?
आम्ही वेगळं काय केलं आहे? आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती तीच घट्ट केली. त्यामुळे चिंतन त्यांनी करण्याची गरज आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे नाही माहित. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळं बोलायला पाहिजे असं नाही. बोलायची वेळ आली तर मी 25 वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झालं? बरेच काही बोलता येते.


3. असंही म्हणतात की तुमच्या विरोधात ईडीची कारवाई झाली आणि तुमच्यात फरक पडला का?
कोण म्हणते त्या काळात (ईडीचा सासेमिरा असताना) मी लोकांशी भेटत नव्हते. फरक माझ्यात एवढाच फरक पडला की मी डायरेक्ट माझ्या मतदारांना भेटू शकत नव्हते, मात्र संपर्कात होते. मी काही दोन वर्षाची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही. मात्र फरक माझ्या व्यवहारात नाही, विचारात नाही तर ज्यांच्यात (विचारात) फरक पडला आहे. त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.


4. तुमच्या ईडी चौकशीच्या काळात तुम्हाला मातोश्रीवरुन हवी तशी साथ मिळाली नाही असे वाटते का?
त्याबद्दल मला काही विशेष बोलायचे नाही. माझी लढाई कायदेशीर होती आणि ती कायदेशीर लढाई मी जिंकली आहे. दूध का दूध पानी का पानी झालं आहे.


भावना गळवींच्या फोटोवर भाजप आमदार राजेंद्र पाटणींचा फोटो, मात्र भाजपच्या पोस्टरवर गवळींना स्थान नाही
यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी या शिंदे गटात सामील झाल्या. आज त्यांचं वाशिम शहरात मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. असं असलं तरी स्थानिक पातळीवरील त्यांचे राजकीय कट्टर विरोधक भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे फोटो खासदार भावना गवळी यांच्या शुभेच्छा पोस्टरवर दिसत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या पोस्टरवर प्रवीण दरेकर यांच्यासह इतर भाजप नेत्यांचे फोटो दिसत असले तरी मात्र भावना गवळी यांना स्थान नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे बाहेरुन शिंदे गट भाजपसोबत असला तरी मनाने किंवा पोस्टरवरुन त्यांची मनं जुळलेली नाहीत हेच दिसतं.  


Bhavana Gawali EXCLUSIVE Washim : शक्तीप्रदर्शन नव्हे तर जनतेचं प्रेम उफळून येईल ABP Majha