वर्धा : महात्मा गांधी यांच्या व्यापक दूरदृष्टीतून आणि सर्वोदय विचारांतून साकार झालेल्या सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम तसेच अतर गांधीवादी संस्थांमध्ये गटातटांचं राजकारण सुरू झालंय. सर्व सेवा संघात दोन गटांचे दोन अध्यक्ष, तर सेवाग्राम आश्रमातही दोन अध्यक्ष अशी स्थिती सध्या निर्माण झालीय. दरम्यान गांधीवादी कार्यकर्ते मात्र हे गटतट थांबवण्याचे आणि वाद संपवण्याचा प्रयत्न करतायत.
महात्मा गांधी यांच्या सर्वोदयी विचारांनी प्रेरित होत ग्रामस्वराज्य स्थापनेसाठी सर्वोदय संघ स्थापन झाला होता. पण या सर्वोदय संघात अलीकडे भूदान घोटाळे समोर आले. लोकसेवक राजकीय नेत्यांच्या रांगेत बसायला लागले आहे. त्यातूनच गट निर्माण होऊन चंदन पाल आणि महादेव विद्रोही यांच्यात गटबाजी सुरू आहे. आता ही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गांधीवाद्यामधील हा विवाद मिटला पाहिजे. सुसंवादाचा पूल बांधला गेला पाहिजे. यासाठी आबा कांबळे हे उपोषणावर बसले. अखेर दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका समोर आल्याने त्यांनी उपोषणाची सांगता केली आहे. पण हा वाद कशासाठी हा प्रश्न अजूनही कायम आहे.
गेल्या काही वर्षात सर्व सेवा संघाचे तत्कालीन अध्यक्ष महादेव विद्रोही यांचा कार्यकाळ संपल्यावर अध्यक्ष पदाचा वाद निर्माण झाला होता. पुढे एका गटाने चंदन पाल यांना अध्यक्ष बनवले तर दुसऱ्या गटाने अरविंद रेड्डी यांना अध्यक्ष बनवले. ही गटबाजी गांधी विचारांना अभिप्रेत नाही. त्यामुळे हा वाद मिटवून गांधीवादी एकत्र आले पाहिजे. पोचमपल्ली येथे सर्व सेवा संघाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात चंदन पाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले होते. पण ते पोहचले नाही. टी. आर. एन. प्रभू यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
हा वाद नेमका कोण वाढवतंय माहिती नाही, आम्हालाही वाटते हा वाद मिटला पाहिजे. पण काही लोकांना हा वाद मिटायला पाहिजे असे वाटत नाही. त्यामुळे हा वाद वाढत आहे असं विद्रोही गटाचे आबा कांबेळ म्हणाले.
गांधीवादी संस्थामध्ये वाढणारा वाद पाहता आबा कांबळे यांनी उपोषण सुरू केले होते, हे उपोषण अखेर सोडवण्यात आले आहे, सामंजस्य निर्माण होण्यासाठी तडजोड करण्यात आली आहे. दोन्ही गटातील पाच- पाच सदस्य पुढील काही दिवसात एकत्र येतील चर्चा करतील आणि हा वाद सुटेल अशी अपेक्षा आहे.
महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आणि हाच संदेश जगात पोहचवण्याचा ध्यास असणाऱ्या गांधीवाद्यांमध्ये दुही निर्माण झाली. आता हे कधी थांबणार ते पाहणे महत्वाचे आहे.
ही बातमी वाचा: