Wardha Rain Updates : वर्धा (Wardha) जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14 जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मिमि म्हणजे 42.9 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झालेलं आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरण 11 जुलै रोजी 60.36 टक्के भरलेले असून, सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या 72 तासांत येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले असून, त्यामधून 178.73 (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सूरु असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 


लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले  


समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे सुद्धा 5 दरवाचे 25 सेमीने उघडण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेले पर्जन्यमान आणि विविध प्रकल्पांमधून करण्यात येणारा विसर्ग यांमुळे पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदिपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरीकांनी नदीपासून तसेच ओढे आणि नाले यापासून दूर रहावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे. नदी अथवा ओढे आणि नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यास गर्दी करु नये. जुनाट आणि मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. 


नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन 


आपत्कालीन स्थितीत संपर्क करा 


धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदिच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भऊ शकतो. पुरामध्ये अथवा धरण क्षेत्रात धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असल्यास झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन स्थितीमध्ये स्थानिक तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन अथवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथील दुरध्वनी क्र. 07152-243446 वर संपर्क करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.