Wardha Rain Updates : हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मोठ्या प्रमाणात परिसरातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे. या पुरामुळे ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून अनेकांची नेहमीची कामे देखील ठप्प झालेली आहेत. नागरिक गावाबाहेर पडू शकत नाही तर विद्यार्थ्यांचे देखील शाळेत जाणं शक्य होत नसल्याने अभ्यासावर मोठा परिणाम होतो आहे. पूरपरिस्थितीने एकंदरीत ग्रामीण भागातील जीवन हे मेटाकुटीस आणलं आहे. पोहणा ते वेणी शेकापूरच्या वाटेमध्ये एक नाला असून त्या नाल्यावरील पूलाला आधीपासूनच मोठे खड्डे पडलेला आहे. आता पावसामध्ये देखील नागरिकांना त्याच्यातून आपली वाट शोधावी लागत आहे. जीवघेणा प्रवास मोटरसायकलवर या पाण्यातून नागरिक करताना बघायला मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनावर अक्षरशः नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 


पुल पाण्याखाली गेल्यानं मोठी अडचण 


हिंगणघाट तालुक्यातील हायवे क्रमांक सातला लागून असलेल्या पोहना वेणी शेकापूर मार्गावरील पुलावर खोलच खोल खड्डे पडले आहेत. तसेच यंदाच्या मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब वाहत आहेत. पुलाची उंची कमी असल्यामुळे कमी वेळात पाण्याखाली गेला असल्याचं नागरिक सांगतात. गावाबाहेर येजा करण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लगतच असलेल्या बाजारपेठेत याच रस्त्याने ग्रामस्थ जातात. बैलगाडी घेऊन शेतकरी  रस्त्यावरून जात असताना अनेकदा  अपघात घडत आहेत. ग्रामस्थांना येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता तर नाहीच सोबतच पुलावर जीव घेण्या खड्यांचा सामना करावा लागत आहे. खोल खड्यात पाणी साचून राहत असल्यानं विद्यार्थांना आपला जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागत आहे. पावसाळाच्या दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहतूक बंद पडते. पोहण्यावरून वेणीला लागूनच एक किलोमीटर अंतरावर  पूल आहे. खोल खड्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी कशी न्यावी हा प्रश्न सतावत आहे. 
 
प्रशासनाकडे तक्रार करुनही परिस्थिती जैसे थेच 


पुलाची उंची कमी आणि त्यावरही रस्त्यावर मोठमोठे खड्डे अपघात घडण्याची मालिका सातत्याची होती. या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रशासन निद्रा अवस्थेत असल्याने गावकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशीच परिस्थिती दिसून येते, कधी साधारण पाऊस जरी आला तर त्या गावाचा पूर्ण दोन दिवस संपूर्ण संपर्क तुटला जातो, अशी तक्रारही येथील नागरिकांनी एबीपी माझाला सांगितली. सदर रस्ता आणि पुलाची तातडीनं दुरुस्ती करावी, नागरिकांना अपघातापासून वाचवावे अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांसह, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांनीही केली आहे.