Wardha Crime : विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान, या आरोपीकडून वितळवलेल्या दागिन्यांसह 3 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सततच्या घरफोड्या होत असल्यानं परिसरातील नागरिक दहशतीत होते. अखेर हा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या आरोपीकडून घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.
विशेष म्हणजे नागपूर आणि वर्धा शहरात अगदी नीटनेटका राहणारा हा व्यक्ती चोर असेल याची कोणाला शंकाही आली नव्हती. मात्र, नीटनेटके कपडे घालून बसने प्रवास करुन दिवसा घरांची पाहणी करायची आणि रात्री टार्गेट केलेल्या घरांच्या घरफोड्या करायच्या हा त्याचा व्यवसाय होता. प्रविण विनायक आक्केवार (54) (रा. चंद्रपुर ) असं या आरोपीचं नाव आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळविल्याच्या अनेक घटना घडत असल्यामुळं परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीत होते. लवकरात लवकर या आरोपींना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी करत होते. पोलिसांनी दिवसा आणि रात्रीही परिसरात पेट्रोलिंग वाढवली आहे. या चोरट्याला अटक झाल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.
बळवंत मारोतीराम कोहाड (रा. साईनगर वर्धा) हे बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश केला. अंदाजे 10 हजार रुपये चोरुन नेले होते. ज्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच रामनगर आणि वर्धा शहर परिसरात रात्रीचे घरफोडीचे प्रमाण वाढल्यानं स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोपीच्या शोधात पेट्रोलींग वाढवली होती. स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल लगड हे पथकासह चोरी व घरफोडीचे गुन्हे वारवांर होत असलेल्या भागात पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला होता.
वितळवलेल्या दागिन्यांसह रोख रक्कम सापडली
पेट्रोलींग पथकातील कर्मचारी चंद्रकांत बुरंगे यांनी संशयिताला लगेच ओळखून तो घरफोडीचा अट्टल गुन्हेगार प्रविण विनायक आक्केवार असल्याचे सांगितल्याने संशयिताची सखोल विचारपूस केली. त्याच्याजवळील साहित्याची पाहणी केली. तेव्हा घरफोडी करण्याकरता वापरण्यात येणारे लोखंडी टामी, लोखंडी छन्नी, पोर्टेबल ईलेक्ट्रानीक वजन काटा, चोरी केलेल्या दागिण्यांना वितळवून तयार केलेले सोन्या चांदीचे तुकडे तसेच नगदी रोख मिळून आले. त्यानंतर पोलीसांनी त्याची सखोल चौकशी केली. आरोपी हा मागील काही महिन्यांपासून केशव सिटी, साईनगर, पिपरी मेघे अशा परिसरात रात्री फिरुन बंद घराची पाहणी करुन चोरी करत असल्याचे आरोपीनं कबुल केले. तसेच हिंगणघाट शहरात सुध्दा चोरी केल्याचं त्यानं कबुल केलं.
आरोपीकडून 3 लाख 84 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या ताब्यातून 3 सोन्याचे तुकडे, चांदीचे तुकडे आणि नगदी 8 हजार रुपये. यासोबतच इतर साहीत्य असा एकुण 3 लाख 84 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत 4 घरी तसेच पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत 2 ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करुन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.