Wardha News : दिवाळीत (Diwali 2022) फटाके (Firecrackers) फोडताना दुखापत होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन सातत्याने केलं जातं. परंतु योग्य खबरदारी घेतली नाही तर काय होतं, याची प्रचिती वर्धा (Wardha) जिल्ह्यात आली. झोपलेल्या व्यक्तीच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन चक्क कान तुटून पडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वर्ध्यात स्टेशन फैल परिसरात काल (30 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. रात्री घरी झोपलेल्या व्यक्तीच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि कान तुटून पडला. युसूफ खान पठाण (वय 56 वर्षे) असं जखमी व्यक्तीचं नाव असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे फटाक्यांची तीव्रता अशाप्रकारे शरीराचा अंगही एका क्षणात वेगळा करु शकतो हे या घटनेने सिद्ध झालं आहे. मात्र ज्या अज्ञाताने मध्यरात्री दीडच्या सुमारास गाढ झोपलेल्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा न करता अंथरुणात सुतळी बॉम्ब फोडला आहे, अशांवर कडक कारवाईची मागणी जखमी युसूफ खान पठाण यांचा मुलगा ऐफाज युसूफ खान याने केली आहे.


नेमकं काय घडलं?
घराचे दार उघडे ठेवून युसूफ हे झोपले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पांघरुणात सुतळी बॉम्ब फोडला. त्यामुळे घरात स्फोट झाल्यासारखा मोठ्ठा आवाज आला. परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली असता युसूफ खान पठाण यांचा उजवा कान खाली अर्धवट तुटून पडला होता आणि ब्लॅंकेट फटाक्यांमुळे जळालं होतं. नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत युसूफ खान पठाण यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी कान टाके मारुन जोडला खरा मात्र ते पूर्वीसारखे होऊ शकणार असल्याचंही त्यांच्या मुलाने संगितलं. 


दु्र्घटनेला जबाबदार कोण, प्रश्न अनुत्तरित 
दिवाळी साजरी करत असताना आणि फटाके फोडताना ते स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र बॉम्ब कोणी फोडला आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण? याचे उत्तर अजूनही शहर पोलिसांना सापडू शकलेलं नाही. शहर पोलिसांना याबाबत विचारणा केली असता प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.


इतर महत्त्वाची बातमी


Ambarnath News : दुचाकीवर चौघे आले आणि थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले, स्टंट करणाऱ्या तरुणांची चांगलीच भंबेरी उडाली!