Ambarnath News : दिवाळीत (Diwali 2022) फटाके उडवताना काळजी घ्या, किंवा गाडी चालवताना नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं. पण हे नियम पाळले नाहीत किंवा काळजी घेतली नाही तर काय होतं, याचा प्रयत्न मुंबई पूर्व उपनगरातील अंबरनाथमध्ये (Ambarnath) आला. दुचाकीवर बसून आलेले चौघे जण फटाक्यांच्या माळेवर पडल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दुचाकी तिथेच सोडून या स्टंटबाजी (Stunts) करणाऱ्या तरुणांनी आपला जीव वाचवला खरा पण आयुष्यभराची अद्दल त्यांना नक्कीच घडली असावी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


रस्त्यात फटाक्यांची (Firecrackers) माळ लावलेली असताना अचानक दुचाकीवर बसून चौघे आले आणि गाडीचा वेग आटोक्यात न आणता आल्याने थेट या माळेवरच पडले. यावेळी तरुणांची चांगलीच भंबेरी उडालेली पाहायला मिळाली. अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी परिसरात बुधवारी (26 ऑक्टोबर) भाऊबीजेनिमित्त नागरिक रस्त्यावर येऊन फटाके फोडत होते. यावेळी एका नागरिकाने रस्त्यात फटाक्यांची माळ लावली होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एका स्कूटरवर चार तरुण बसून भरधाव वेगात पुढे येत होते. फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक काही लागले नाहीत आणि हे तरुण थेट या माळेवरच येऊन पडले. त्यानंतर गाडी तिथेच टाकून या चौघांनी बाजूला पळ काढला आणि माळ फुटून झाल्यावर जाऊन आपली गाडी उचलली. 


या घटनेत रस्त्यावर माळ लावल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी जरी दिसत असलं, तरी एकाच स्कूटरवर चार तरुण बसून भरधाव आले, ही बाब देखील व्हिडीओत स्पष्टपणे दिसते. त्यामुळे हे तरुण गाडीवर भरधाव वेगात स्टंटबाजी करत होते आणि ती स्टंटबाजी या चौघांना चांगलीच शेकली, अशीही चर्चा परिसरात सुरु आहे.


नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण
'फटाके फोडा पण घरावर टाकू नका' असं सांगितल्यावरुन टोळक्याने युवकाला जबर मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये तीन दिवसांपूर्वी घडली होती. या मारहाणीत युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकच्या फुलेनगर परिसरात ही घटना घडली असून संविधान मधुकर गायकवाड असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.