वर्धा : वर्धा (Wardha) तालुक्यातील जामठा येथे अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या खदानीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत आढळून आलेले दोन स्टोन क्रशर जप्त करण्यात आले असून दोन वाहने व एक पोकलॅंड जमा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेप्रमाणे गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकाने ही कार्यवाही केलीय.


जिल्हा खनिकर्म अधिकारी डॅा.अतुल दौड यांच्यासह तहसीलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवालाच्या पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणुकीस आळा घालण्यासाठी आकस्मिक पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाच्या पहिल्याच धाडीत ही कारवाई करण्यात आली. जामठा येथील या खदानीचा साठा व विक्री परवान्याची मुदत संपुष्टात आली होती.  अवैधरित्या उत्खनन करून स्टोन क्रशर चालविण्यात येत होते. पथकाच्या धाडीत ही बाब समोर आल्याने कारवाई करण्यात आली.


खदान परिसरात अवैध वाहतूक करताना दोन वाहने व एक पोकलेन आढळून आला. दोन वाहनांसाठी 4 लाख तर पोकलेनसाठी 7 लाख 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सदर दंडाची 11 लाख 50 हजार  रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. तसेच अवैधरित्या कार्यरत दोन स्टोन क्रशरदेखील सील करण्यात आले आहे.


खदान परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी 


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धाड टाकण्यात आलेल्या जामठा येथील या खदान परिसराची पाहणी केली. जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी जाणून घेतली. अवैधरित्या उत्खनन झालेल्या क्षेत्राचे ईटीएस मशिनद्वारे मोजमाप करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अवैध उत्खननाचे परिमाण निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जामठा खदान क्षेत्रावर यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.


खदान परिसरालाा सुरक्षा कुंपण 


उत्खननाची परवानगी असलेल्या खदान परिसरात मोठ्या प्रमाणात दगड गोट्यांचे उत्खनन केले जाते. त्यामुळे याठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व खदानींना तारेचे कुंपण करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना केल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या :