वर्धा : देशात भीतीचे वातावरण असून दडपशाही सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. "दमदाटीच्या वातावरण याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आज थेट आवाहन देतो, आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहे का ते सांगा. 24 लाख कुटुंब हे भारताचे नागरिकत्व सोडून गेले, ज्यांची मालमत्ता 100 कोटीच्या आसपास आहे. यात मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, हे 24 लाख कुटुंब सर्व हिंदू आहे, असं आंबेडकर म्हणाले. वर्धा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वर्ध्यात असणाऱ्या सभेला महाएल्गार नाव दिलं आहे. याचं कारण एका बाजूला दडपशाही चालली आहे. महाविकास आघाडीमधून निरोप येतो तुम्हाला अशोक चव्हाण यांच्याशी बोलायचं आहे. आता ते अशोक चव्हाणच गायब, मग बोलायचे कुणाशी. ही दडपशाही आहे. पण कुटुंबाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवा म्हणून, जे काही आरएसएस, बिजेपीचे सरकार धमकवते, ब्लॅकमेल करत आहे. कुटुंबाला वाचवायला जा पण जाताना एक निर्णय करा, लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लोलवल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय करा, असेही आंबेडकर म्हणाले.
भाजपचं सरकार आल्यावर व्यापाऱ्यांच्या नंबर...
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "इथला व्यापारी जो आहे, त्याला मी आगा करतो, चेतावणी देतो. आता सर्व राजकीय नेत्यांच्या नंबर लागला आहे, धाडी घालण्याचा. यानंतर व्यापाऱ्यांचा नंबर आहे. तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. व्यापाऱ्यांचा नंबर लागणार आहे, पुढे तर तुमच्यासाठी लढायला देखील माणसे शिल्लक राहणार नाही. जे आज राजकिय नेत्यांचे झाले ते व्यापाऱ्यांचे होऊ नये याची खबरदारी व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे, तिसऱ्यांदा भाजपला निवडून येऊ देऊ नका, असे आंबेडकर म्हणाले.
अन्यथा दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल
आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाही, बरोबरीने वागा, हाताच्या बाहेर परिस्थिती गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी सुद्धा म्हणतो की, अश्रूधुर सोडायच्या सोडा, पण यापुढे गेले तर सोडणार नाही. या देशात अराजकता आली आहे. आयाराम गायारामच्या भरवश्यावर कारभार देशात सुरु आहे. आज राजकारणातल पाणी पूर्ण गढूळ झाल आहे. यामुळे त्यात नवीन पाणी टाकून फायदा नाही, पाणीच बदलाव लागेल. त्यामुळे यावेळी जाती, नातेवाईक यांना प्राधान्य दिल्यास दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल. राजकारण्यांचा उन्माद वाढले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बोलतात की, आंदोलन कराल तर कारवाई होईल. आंदोलन ही समस्या मांडण्याचा माध्यम आहे. ते सुद्धा तुम्ही बाटलीत बंद करण्याचं ठरवल आणि उद्या ती बाटली फुटली तर सांभाळणार कोण, असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या :