Maharashtra Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या हद्दीलगत दुर्लक्षित असलेल्या ताडगावच्या शेकडो शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी रोज मरणाशी संघर्ष करावा लागत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या लाल नाल्यावरून वहीवाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क बांबूचा पूल तयार केला. जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. सध्या जवळजवळ दीडशे शेतकरी या पुलावरून जीवघेणा प्रवास करत आहेत.
स्वातंत्र्य काळापासून हा संघर्षमय प्रवास येथील शेतकरी करीत असले तरी या समस्येकडे शासन आणि प्रशासनाने पाठ फिरवली असल्याचं दिसतंय. कुठे गेला निधी, कुठे आहे नेते असे म्हणण्याची वेळ गावकर्यांवर आली आहे. विशेषतः ज्या नाल्याच्या नावावरून लाल नाला प्रकल्प तालुक्यात आहे. त्याच प्रकल्पाचा हा नाला उगमस्थान आहे.
जीवघेण्या मार्गावरून रोज होतोय प्रवास
ताडगाव हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीवर जंगलात वसलेले आहे. या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली असून गावाच्या उत्तरेस जवळजवळ 150 शेतकऱ्याची शेतजमीन असल्याने त्यांना लाल नाल्यातून प्रवास करावा लागतो. या नाल्याच्या पात्रातून नियमित पुराचा प्रवाह राहत असल्याने शेतकऱ्यापुढे वहीवाटीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे इतर ठिकाणचे दौरे करणाऱ्या मंत्र्यांनी आमचीही अवस्था बघावी, अशीच मागणी येथील शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांनी पूल कधी बांधला?
उन्हाळ्यामध्ये या नाल्याला पाणी नसल्यामुळे या नाल्यातून शेतकरी आपलं शेत गाठतात. अशाच प्रकारे त्यांनी यावर्षीच्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाली आणि नाल्याला मोठा पूर आला. नाल्याच्या पुरामुळे शेतात जाणं अशक्यच होतं. मात्र आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी वाट शोधली असून थेट बांबूचा पुलावरून वाट काढत मरणाचा मार्ग पत्करला आहे. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी एकत्रित येत हा पूल उभा केला असून रोजच चक्क जीव घेणा प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
सरपंचांनी केली होती मागणी; मात्र परिस्थिती 'जैसे थे'
पूरपरिस्थितीमुळे पीक खरडून गेले. यातून मार्ग काढण्यासाठी ताडगावच्या शेतकऱ्यांना मार्गाचा अडथळा निर्माण झाल्यानं चक्क शेकडो शेतकऱ्यांनी बांबूचा पूल उभारून जीवघेणा प्रवास सुरु केला आहे. 2015 या वर्षी तत्कालीन सरपंच यांनी प्रशासनाकडे या नाल्यावर पूल निर्मिती करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही या पुलाची निर्मिती करण्यात आली नसल्यानं आम्हाला जीवघेना प्रवास करावा लागतो अशी प्रतिक्रिया
सरपंच विनायक श्रीरामे यांनी सांगितली. या नाल्यातून वहीवाट करण्यासाठी शेतकरी सचिन सोनवाने, अनिल श्रीरामे, अरुण मडावी, काशिनाथ मडावी, छत्रूघन मसराम, देविदास चौधरी, अमोल नन्नावरे, अविनाश सोनवणे, नितीश वाघ, प्रभाकर मसराम यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या नाल्यावर बांबूचा पूल तयार केला आहे. मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेत या नाल्यावर सिमेंट पुलाची निर्मिती करावी अशी मागणी ताडगाव वाशियांची आहे.