Arvi Vidhan Sabha Election 2024 आर्वी : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल अखेर फुंकल्या गेले आहे. या निवडणुकांच्या (Vidhansabha Election 2024) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती (MahaYuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असाच सामना होणार आहे. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा एकला चलो रे चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. तसेच राज्यात झालेल्या अलिकडे झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे यंदाची निवडणुक अधिक चुरशीची होणार हे जवळ जवळ निश्चित आहे. 


दरम्यान, राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस गेल्या लोकसभेला तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली. असे असले तरी गेल्या लोकसभेच्या वेळी विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधनसभा निवडणुकीला नेमकं कुणाची हवा असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघातील आर्वी विधानसभा क्षेत्रात (Arvi Vidhan Sabha Election 2024) सध्या राजकीय परिस्थिति काय? हे जाणून सविस्तर जाणून घेऊया.


मविआ-महायुतीतून आर्वी विधानसभेसाठी कुणाच्या नावाची वर्णी? 


आर्वी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मागणारे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह धरला आहे. शेतकरी आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान राहिले आहे. तर याच मंतदारसंघाच्या शर्यतीत अनंत मोहोड, प्रिया शिंदे यांनी देखील उमेदवारी मागीतली आहे. महाविकास आघाडीत आर्वी मतदार संघ काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला या नाणेफेकीत नाणे कुणाच्या नशिबाला साथ देणार? असाच प्रश्न आहे.  


लोकसभेत काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकणारे अमर काळे आर्वी विधनसभेवर आपल्या कुटुंबातील सदस्यासाठी दावा करणार का? ही चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. अमर काळे यांच्या पत्नी मयुरा अमर काळे अलीकडे विविध आंदोलनात पाहायला मिळत असल्याने राजकीय चक्र तसेही फिरू शकतात, असेच राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 


तर महायुती मध्ये आर्वी विधनसभेत रस्सीखेच पाहायला मिळते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांनी अद्याप उघडपणे उमेदवारी मागीतली नसली तरी भाजपच्या अंतर्गत गोटात आणि आर्वीकरांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. यामुळे विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या उमेदवारीवर अनिश्चीततेचे सावट आहे. दोघांमध्ये नेमकी उमेदवारी कुणाला या चर्चेला आर्वी येथे चांगलाच पेव फुटला असताना ऐनवेळी आमदार दादाराव केचे कोणता निर्णय घेतात? याकडे लक्ष आहे. येथे माजी जि. प अध्यक्षा सरिता गाखरे यांच्या नावाचा विचार देखील होऊ शकतो.


आर्वी विधानसभेत खासदाराच्या पत्नी तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात? 


लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या अमर काळे (Amar Kale) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढल्यामुळे. पण आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या (Congress) हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणीही मतदारसंघात सुरू असल्याची चर्चा आहे.


असे असले तरी एकाच घरात दोन्ही उमेदवारी देण्याला आता काँग्रेसकडून विरोध व्हायला लागला आहे. पती खासदार तर पत्नी आमदार अशा घराणेशाहीच्या राजकारणाला काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी विरोध केला आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात सामान्य माणसाशी नाळ जुडवून असलेले अनेक नेते असताना येथील जागा ही काँग्रेसला सुटावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.


आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचाच वरचष्मा


आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले. 1967 मध्ये काँग्रेसचे जे.पी. कदम आमदार राहिलेत. 1972 मध्ये अपक्ष धैर्यशील वाघ आणि1978 मध्ये शिवचंद चुडीवाल अपक्ष आमदार होते.  1980 मध्ये शिवचंद चुडीवाल काँग्रेसच्या तिकीटावर आमदार बनले. त्यानंतर 1985, 1990, 1995, 1999 असे सलग चारवेळा शरद काळे काँग्रेसकडून आमदार झाले. शरद काळे यांना राज्यात मंत्रीपदही मिळालं. शरद काळे यांचे चिरंजीव अमर काळे यांना घरीच राजकारणाचं बाळकडू मिळालं.


2004 मध्ये अमर काळे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये आर्वीला झालेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी अमर काळे विजयी झाल्यास राज्यात मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. पण अमर काळे यांचा पराभव करत दादाराव केचे यांनी प्रथमच या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी अमर काळे फक्त तीन हजार 130 मतांनी पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसची जागा परत मिळवली. यावेळीही विजयाचं अंतर तीन हजार 143 मतांचंच राहिलं. 


हे ही वाचा