वर्धा : जिल्ह्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून देवळी तालुक्यातील दिगडोह गावाजवळील यशोदा नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात पूल वाहून गेल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे.
नागझरी मार्गावरील दिगडोह या गावालगतचा पूल दिनांक 4 जुलैच्या रात्रीच्या पावसामुळे पहाटे वाहून गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पूल नदीच्या पात्राच्या तुलनेत कमजोर आहे. पुराचे पाणी वाढल्याने ही अवस्था झाली. या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी अनेकदा नागझरी, दिगडोह येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी केली होती. परंतु, त्याची दखल न घेतल्याने हा पूल वाहून गेल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.
पूल खचल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांची वाट हरपली
वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला ग्रामीण भागात शेतकऱ्यांची शेती देखील पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. नुकतीच शाळा सुरू झाली असून विद्यार्थी मोठ्या आनंदात उत्साहात शाळेत जाताना दिसतात. पावसात भिजत जाण्या-येण्याचा आनंद विद्यार्थी घेताना दिसतात. मात्र जवळपासच्या गावाचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेची वाटच वाहून गेली. यासोबतच परिसरातील शेतकऱ्यांनी नुकत्याच पेरण्या आटोपल्या असून अंकुरलेल्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. त्याची काळजी घेण्याची तयारी आणि शेती फुलवण्याच्या तयारीत शेतकरी असताना आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्याची नाल्याच्या पुलावरील वाटच वाहून गेली आहे. त्यामुळे अक्षरशः परिसरातील शेतकरी मनस्ताप व्यक्त करत आहेत. आता हा पूल केव्हा दुरुस्त होतो याकडे विद्यार्थी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यशोदा नदीवरील पुलावरून होती 5 ते 7 गावांची वाट
याच पुलावरून डिगडोहसह जवळपासच्या पाच ते सात छोट्या गावांच्या नागरिकांची वहिवाट होती. अनेकांच्या घरी वृद्ध आणि चिमुकले आहेत, विद्यार्थी शिक्षक शेतकरी नोकरदार व्यवसायिक इतर सर्व नागरिकांची याच पुलावर भिस्त होती. हा पूलच वाहून गेल्याने नित्यनेमाची काम कशी करावी, वृद्ध आणि चिमुकल्यांना, गावातील नागरिकांना रुग्णालयात जावं लागलं तर वाट शोधावी तरी कुठून असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. दिगडोह गावातील हा मोठा नाला आहे. जोरदार आलेल्या पावसाने यशोदा नदीवरील पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागले तेव्हाच नागरिकांना पूल वाहून जाण्याचा अंदाज आला होता आणि अखेर ज्याची भीती होती तेच झालं. विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची वहिवाट अखेर वाहून गेली. त्यामुळे प्रशासन याची गंभीर दखल घेताय का हेच बघावे लागेल.