Wardha News : रायगडमध्ये (Raigad) संशयित बोटीमध्ये एके47 रायफल आणि काडतुसं सापडल्याची घटना ताजी असतानाच आता वर्धा (Wardha) जिल्ह्यातील तळेगाव इथे सार्वजनिक ठिकाणी स्फोटकं (Explosives) आढळल्याने खळबळ उडाली आहे. तळेगावमधील ओम डेली नीड्स या दुकानाच्या बाहेर स्फोटकं आढळली. सीडीएट या कंपनीतील ही स्फोटकं असून ती बाहेर कशी आली असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.


ओम डेली नीड्सचे संचालक दत्ता पुसदेकर हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपलं दुकान उघडण्यासाठी आले. दुकानाची साफसफाई करताना त्यांना दुकानाच्या बाहेर असलेल्या काऊंटरच्या बाजून एका कागदामध्ये तीन नळकांड्या गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्या. यांनी त्यांनी ही बाब त्यांच्या मित्राच्या लक्षात आणून दिली. स्फोटकसदृश्य या नळकांड्या तपासल्या असताना त्यावर धोका असा सावधानतेचा इशारा लिहिलेला होता. त्यानंतर दोघांचीही तारांबळ उडाली.


रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा, एके-47 सह बोटीवर 2 चॉपरही आढळले


स्फोटकं बाहेर कशी आली?
त्यांनी तातडीने याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. काही वेळाने तिथे पीएसआय हुसेन शहा आणि पोलीस शिपाही आले. त्यांनी याची माहिती ठाणेदार आणि वरिष्ठांना दिली. ही स्फोटकं सीडीएट या कंपनीमधील असल्याचं समोर आलं. परंतु स्फोटकं असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र ही स्फोटके कंपनीबाहेर आलीच कशी? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.


स्फोटकच आहेत का याचा तपास सुरु : प्रशांत होळकर, पोलीसी अधीक्षक, वर्धा
दरम्यान या संदर्भात वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी एबीपी माझाने संपर्क केला. त्यांच्या माहितीनुसार, "तळेगाव इथे एका दुकानासमोर तीन कांड्या सापडल्या आहेत. त्या डमीही असू शकतात. त्याच्यामध्ये नक्की स्फोटकच आहेत का या संदर्भात पोलीस तपास करत आहेत." एकंदरीत या प्रकरणात या कांड्यांमध्ये नेमकी कशा प्रकारची वस्तू आहे याचाच तपास पोलीस करत आहेत.


रायगडमध्ये संशयित बोटीत एके-47 रायफल आणि राऊंड्स आढळले
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधल्या हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्रकिनारी 18 ऑगस्ट रोजी संशयास्पद बोट आढळली होती. या बोटीत दोन-तीन एके-47 रायफल आढळल्या होत्या. त्याशिवाय 225 राऊंड्स आढळून आल्या होत्या. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आलं. या बोटीत कोणीही व्यक्ती नव्हती.या बोटीमागे दहशतवाद्यांचा हात नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी यानिमित्ताने सागरी सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.