Vidarbha Rain Update : गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 12 तालुक्यात 52.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 15 मंडळात मुसळधार तर 10 मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सद्यस्थितीत 10 जिल्हा मार्ग बंद असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड-आल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील (Vidarbha Rain Update) अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिकाच पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना सलग चार दिवसांपासून पूर

दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नद्याला सलग चार दिवसांपासून पूर आल्याचे चित्र आहे. परिणामी हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकं अक्षरशः वाहून गेली आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह शेतीउपयोगी शेतकऱ्यांचं साहित्याच मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील सर्व 45 मंडळात यावर्षीच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीची नोंद झालीये. तर यापैकी 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये.

दरम्यान, रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द परिसरात चार वेळा अतिवृष्टी झाली. त्यात कांच, उतावळी नदीच्या प्रवाहात शेकडो हेक्टर शेतीच नुकसान झालं. मात्र प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे सुरु केले असले तरी हे पंचनामे योग्य पद्धतीनं होतं नसल्याचा आरोप पिंपरी सरहद्द परिसरातील शेतकऱ्यांनी केलाय.

नाल्याच्या पुरात युवक वाहून गेला

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असताना नाल्याच्या पुरातून रस्ता ओलांडताना कोडपे गावातील 19 वर्षीय युवक वाहून गेला आहे.  लालचंद कपिलसाही लकडा असे तरुणाचे नाव असून सध्या स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

आम्हाला मदत जाहीर करा, शेतकऱ्याची सरकारकडे अर्त हाक

हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचे झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरलं आणि त्यामुळे शेतातील पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. पूर्णा कयाधू आणि पैनगंगा या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीच अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जवळ असलेले पूर्ण पैसे खर्च करून शेतामध्ये पिकाची पेरणी केली, जोपासना केली, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे पिक उध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी आता सरकारकडून अपेक्षा लावू लागला आहे.

ही बातमी वाचा: