Vidarbha Rain Update गडचिरोली : गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. सोमवारी देसाईगंज उपविभागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक लहान नाल्यांना पूर आला असून कुठे पुलावर पाणी, तर कुठे रस्ता वाहून गेल्यामुळे तब्बल 6 जिल्हा मार्ग बंद झाले आहे. यामध्ये कुरखेडा- मालेवाडा हा राज्यमार्ग खोब्रागडी नदीच्या पुरामुळे बंद आहे. तर मांगदा- कलकुली, आंधळी नैनपुर, रामगड-उराडी, कुरखेडा-तळेगाव -पळसगाव, कढोली-उराडी हे जिल्हा मार्ग स्थानिक नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून बंद आहे. सोमवारी जिल्ह्यात सरासरी 64.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून देसाईगंज मंडळात 209 तर मुरुमगाव आणि शंकरपूर या 3 मंडळात 130 मिलिमीटर पाऊस झाला. तर 14 महसूल मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
भंडाऱ्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या कडाच गेला वाहून
भंडारा शहरालगत मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 650 कोटी रुपयांच्या खर्चातून 15 किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील 24 तासांपासून भंडारा जिल्ह्यात आलेल्या पहिल्याचं जोरदार पावसात या बायपास महामार्गाच्या सुरक्षेकरिता निर्माण करण्यात आलेल्या कडा वाहून गेल्यात. या सिमेंटच्या कडा वाहून गेल्यानं त्याखालील मातीही आता पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि फोरव्हीलर वाहनांची भरधाव वाहतूक असते.
विशेष म्हणजे, भंडारा शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता हा बायपास महामार्ग उद्घाटनापूर्वीचं सुरू करण्यात आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला या बायपास महामार्गावरील कडा उद्घाटनापूर्वीचं पावसामुळं घसरलाय आणि महामार्गावर भरण केलेली मातीही हळूहळू निसरडू लागल्यानं याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी केलाय.
वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कुठे रिपरिप, तर कुठे सरीवरसरी पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कोरडे पडलेले जिल्ह्यातील नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. त्यातच गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी येथील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजच्या 38 पैकी 1 दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी जिल्ह्यात 5 महसूल मंडळात 70 पेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस झाला तर सोमवारी देसाईगंज, शंकरपुर, कोरची, कुरखेडा या महसूल मंडळात कुठे 200 तर कुठे 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा