Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: सिनेमा आणि वेब सीरिजपेक्षाही मालिकाविश्व खूप मोठं आहे. दर महिन्याला म्हटलं तरी कोणत्या ना कोणत्या चॅनलवर अनेक हटके विषयांवरच्या दमदार मालिका येत असतात. अशातच, टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग मालिकांमध्ये ट्वीस्ट अँड टर्न्स आणि महाएपिसोड्स यांसारखे फंडे आजमावले जातात. याव्यतिरिक्त कुणीतरी गाजलेला पाहुणा कलाकार मालिकेत आणून जोरदार प्रमोशन केलं जातं. अशातच 'झी मराठी'वर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेत थेट बॉलिवूडच्या सुपरस्टार (Bollywood Actress) अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
'झी मराठी'वर (Zee Marathi) 'कमळी' (Kamli Serial) ही नवीकोरी मालिका सुरू होणार आहे. झी मराठीकडून नव्या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत विजया बाबर (Vijaya Babar) दिसणार आहे. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये जाऊनही अभिनेत्री मालिकेचं प्रमोशन करत आहे. असाच एक प्रमोशनचा हटके फंडा झी मराठी वाहिनीनं आजमावला आहे. आता मालिकेत 'कमळी'ची शिक्षिका होऊन थेट बॉलिवूडची सुपरस्टार विद्या बालन एन्ट्री घेणार आहे.
विद्या बालन (Vidya Balan) हे इंडस्ट्रीतल्या गुणी अभिनेत्रींपैकी एक नाव. अनेक सुपरहिट सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेल्या विद्यानं आपल्या कारकीर्दिला टेलिव्हिजनपासूनच सुरुवात केली. अशोक सराफ स्टार 'हम पांच' या गाजलेल्या मालिकेतून विद्या बालननं मनोरंजन विश्वास पदार्पण केलं. त्यानंतर विद्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, आता विद्या बालन चक्क एका मराठी मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली आहे.
झी मराठीवर 'कमळी' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिक्षणाची ओढ असलेल्या खेडेगावात राहणाऱ्या आणि मोठ्ठी स्वप्न पाहणाऱ्या कमळीला विद्या बालन शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देणार आहे. नुकताच वाहिनीनं मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये विद्या बालन कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवलंय?
प्रोमोमध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारत असल्याचं पाहायला मिळतंय. "भारताची आर्थिक राजधानी कोणती?" असं विचारताच कमळी मुंबई असं उत्तर देते. नंतर ती कमळीला मुंबईतील विमानतळाचं नाव काय, असं विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते. त्यानंतर मात्र विद्या कमळीला गोंधळात टाकणारा प्रश्न विचारते. विद्या कमळीला म्हणते की, दादरहून डोंबिवलीला जाण्यासाठी तू कोणती ट्रेन पकडशील? या प्रश्नानंतर मात्र कमळीची बोबडी वळते. म्हणते की, "मॅडम... मुंबईच्या ट्रेनचा खूप भूल-भुलैय्या असतो बघा..." कमळीनं उत्तर दिल्यानंतर विद्या तिला म्हणते... "म्हणजे, आता छडी लागे छम छम..."
शेवटी विद्या बालन उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या 'कमळी'ला तीन महत्त्वाचे सल्ले देणार आहे. अभिनेत्री म्हणते, "पहिलं म्हणजे वडापाव खाताना लाजायचं नाही", दुसरी गोष्ट "जीभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचा" आणि तिसरी गोष्ट म्हणजे "मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सदैव ठेवायचा.."