Ram Mandir : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर  QR कोड शेअर करुन राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत. या QR बरोबरच राम मंदिराच्या (Ram Mandir)  उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्हीही योगदान द्या, असा संदेश दिला जातोय. विश्व हिंदू परिषदेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय, अशा लोकांना कोणताही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून (Vishva Hindu Parishad) करण्यात आलंय 


फेसबुकवर (Facebook) "श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट" (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) या नावाने एक प्रोफाईल बनवण्यात आलीये. यावरुन एक QR कोड शेअर करण्यात आलाय. ही प्रोफाईल अभिषेक कुमार या नावाने आहे. या अकाऊंटवरुन राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्तांनी योगदान द्यावे, असा संदेश देण्यात आलाय. याशिवाय युपीआय नंबरही व्हायरल करण्यात आला आहे. त्यावरुनही भक्तांची फसवणूक करण्यात येत आहे.  उत्तर प्रदेश पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, "राम भक्तांची ही फसवणूक म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या अवैध मार्गाने लोकांकडून पैसा उकळला जातोय. पोलिसांनी भक्तांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत."


राम मंदिरासाठी पैसे मागितले जात नाहीयेत - विहिंप 


विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) प्रवक्ते विनोद बंसल (Vinod Bansal) याबाबत बोलताना म्हणाले, अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जात नाही. शिवाय यासाठी कोणतीही समिती बनवण्यात आलेली नाही. राम मंदिराचे लोकार्पण (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. संपूर्ण देशाला याचा आनंद आहे. मात्र, लोकांच्या भावनांचा काही लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे. शिवाय, अशा लोकांना कोणताही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन मी रामभक्तांना करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Tehreek-e-Hurriyat Ban : केंद्र सरकारकडून आणखी एका संघटनेवर बंदी; भारतविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका