Jammu Kashmir :  केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) आणखी एका संघटनेवर कारवाई केली आहे. काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष 'तेहरिक-ए-हुर्रियत'ला (Tehreek-E-Hurriyat) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ही माहिती दिली आहे. अमित शाह म्हणाले की फुटीरतावादी पक्ष तेहरीक-ए-हुर्रियत (TeH) ला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) 'बेकायदेशीर संघटना' घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. 


काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील आणखी एका संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. 27 डिसेंबर रोजी सरकारने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) या संघटनेवर बंदी घातली होती. दहशतवादी संघटना म्हणून केंद्राने जाहीर केले होते. या संघटनेचा नेता मसरत आलम भट हा भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या समर्थनात त्याने काश्मिरी खोऱ्यात कारवायादेखील केल्यात. 


भारतापासून वेगळा होण्याचा कट 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 'तेहरिक-ए-हुर्रियत' दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे आणि जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश आहे. 'तेहरिक-ए-हुर्रियत'ही काश्मीरमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देत होती. या संघटनेकडून इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू होता. भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तात्काळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 


काय म्हणाले अमित शहा?


"तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) ला UAPA अंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' घोषित करण्यात आले आहे," केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले. जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या कार्यात ही संघटना सहभागी होती. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती. 






मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम (MLJK-MA) संघटनेवर बंदी


मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम (MLJK-MA) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई  बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये (Jammu Kashmir Terrorist Activity) या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता. ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, दहशतवादी कारवायांचे समर्थन करत असल्याचे केंद्राने म्हटले.