नागपूर : नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील तेरा तालुक्यात नवीन रास्त भाव (Ration Shop) दुकान मंजूर करण्यासाइी जिल्हा पुरवठा कार्यालामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतीम मुदत 29 जुलैपर्यंत आहे. जाहिरनामे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी व संबंधीत गावात प्रसिध्द करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत, तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास अर्ज करु शकतात.


जाहिरनाम्याच्या अनुषंगाने इच्छुक अर्जदाराने अर्ज भरण्यासाठी संबंधित तालुक्याशी संपर्क साधून जाहिरनामाच्या गावाची खात्री करुन अर्ज सादर करावा. तालुकानिहाय जाहिरनाम्याची संख्या याप्रमाणे आहे.नागपूर (ग्रामीण)-21 दुकाने, कामठी-3 दुकाने, हिंगणा-1 दुकान, रामटेक-7 दुकाने, पारशिवनी-20 दुकाने, मौदा-24 दुकाने, उमरेड-7 दुकाने, कुही-6 दुकाने, भिवापूर-12 दुकाने, काटोल-37 दुकाने, नरखेड-20 दुकाने, सावनेर-7 दुकाने, कळमेश्वर-2 दुकाने, अशी एकूण 167 रास्त भाव दुकानांची नोंद जाहिरनाम्यात दर्शविण्यात आली आहे.


माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना रोजगाराची सुवर्ण संधी


नागपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांमुलींचे वसतिगृह (Hostel) आणि माजी सैनिक विश्रामगृह, हिस्लॉप कॉलेजजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित 14 हजार 852 रुपये कंत्राटी पध्दतीने सहाय्यक वसतिगृह अधीक्षक एक पद  आणि सहाय्यक वसतिगृह अधीक्षका दोन पद  ( 175 दिवसासाठी ) भरावयाचे आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी या कार्यालयात 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सेनेच्या सेवेतील संपूर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.  अशासकीय वसतिगृह अधीक्षक या पदासाठी सैन्यातील हवालदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यावर काम केलेल्या संवर्गातून निवड केल्या जाईल आणि अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षीका या पदासाठी माजी सैनिक विधवा यांना प्राधान्य देण्यात येईल.


रेशिमबाग येथे सोमवारी रोजगार मेळावा


नागपूर : गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता निकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज तुळशीबाग रोड, रेशिमबाग (Reshimbag)  येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 25 विविध औद्योगिक आस्थापना सहभागी होणार असून मॅट्रीक, नॉनमॅट्रीक, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलीटेक्नीक, पदविकाधारक (Graduate), अभियांत्रिकी स्नातक, कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधर, कृषी पदविका/पदवीधर, जीएनएम (GNM), एएनएम., बीएससी नर्सींग, कौशल्य प्रमाणपत्र अशा सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीची संधी प्राप्त होणार आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.