Coronavirus Cases Today in India : देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतोय तर दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरसचाही धोका आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी 20 हजार 139 रुग्ण आणि 38 रुग्णांचा मृत्यू झाला. तुलनेनं कोरोना रुग्ण संख्या काही अंकानी घटली असली, तरी वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


एकूण 5 लाख 25 हजार 604 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 47 जणांचा मृत्यू झाला. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 604 इतकी झाली आहे. सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 39 हजार 73 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.32 टक्के आहे. तर देशातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 994 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 45 हजार 350 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.


महाराष्ट्रात गुरूवारी 2229 नवे कोरोना रुग्ण
गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाच्या 2229 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण 2594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या  3318 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात  गुरुवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला आहे.






पुढचे 75 दिवस मोफत बूस्टर डोस
केंद्र सरकारकडून आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.


भारतात केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण


मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे.  आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे.  आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.