UP Mahakumbh Mela 2025 Latest Marathi News: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात (Maha Kumbh Mela 2025) संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी रात्री दीडच्या सुमारास (29 जानेवारी) चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या भाविकांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. भाविकांच्या गर्दीमुळे काही महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीनंतर 13 आखाड्यांनी अमृतस्नान कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तसेच चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाने तातपुरत्यास आंघोळीसाठी न जाण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन-
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याशी महाकुंभमेळ्यातील परिस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच कुंभ मेळाव्यातील घडामोडींचा आढावा घेतला आणि तातडीने मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हाय अलर्ट-
जखमींना महाकुंभात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयात उपस्थित आहे. जखमींना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेण्याची तयारीही करण्यात आली आहे. प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सर्व डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती-
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनानं आकडेवारी जाहीर केलेली नाही.