मुंबई : राज्यातील दोन्ही शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख नेते हे सध्या दिल्लीच्या वारीवर असून दोघांच्याही दौऱ्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळालचं लक्ष लागले आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे सकाळी 11 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर ते संसदेत जाऊन शिवसेनेच्या नव्या कार्यालयात दुपारच्या सुमारास जातील. तर सायंकाळी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला इंडिया आघाडीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर आज दिल्लीत प्रत्यक्ष बैठक होणार आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची विस्तृत बैठक पार पडली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
- आगामी बिहार निवडणुकी संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत विस्तृत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असून 9 सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची रणनीती ठरवली जाणार आहे. तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार दिला जाणार? यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-मतदार याद्यांमधील घोळा संदर्भात विस्तृत चर्चा होण्याची शक्यात आहे. महाराष्ट्रनंतर आता बिहार निवडणुका होणार आहेत. बिहार निवडणुकीत मतदार याद्यांचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन (SIR) पुनर्नरीक्षण करून ज्याप्रकारे 65 लाख मतदार कमी झाले. यावर आक्षेप घेतला जाणार आहे. त्यामुळे मतदार यादी गोंधळ यावर चर्चा होणार आहे.
-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा व या मुद्द्यावर आघाडीची एकत्रित भूमिका मांडण्याचा विचार - ऑपरेशन सिंदूर, भारत-पाक युद्धात ट्रम्पची भूमिका, भारतावर डोनाल्ड ट्रम्पने लादलेला अतिरिक्त 25% टॅरिफ अशा सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती एकत्रितरित्या इंडिया आघाडीकडून आखली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.