नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील शिंदेंनी सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन ठाकरे बंधूंना डिवचलं. जनता कामाच्या जोरावर मतदान करते, नावावर नाही अशी बोचरी टीका ठाकरे बंधूंवर केली.
उपमुख्यमंत्री शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शिंदेंनी मोदींना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, तसेच मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी आधी 'ऑपरेशन सिंदूर' आणि आता 'ऑपरेशन महादेव' यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा देखील भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच शिवसेना - भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही त्यांनी या भेटीत पंतप्रधानाना सांगितले.
उद्धव ठाकरेंवर टीका, युतीवरुन डिवचलं
आम्ही लोककल्याणच्या मार्गाकडे गेलो, ते दहा जनपथकडे गेले, बाळासाहेबांना आवडलं नसतं ते त्यांनी केलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या मार्गाकडे गेलो, असेही त्यांनी म्हटले. आघाडी युती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण स्वतःवर विश्वास नसतो म्हणून दोन दगडावर पाय ठेवतात. हिंदुत्वाचा अपमान करतात, त्यांनी (उद्धव) हिंदुत्व सोडलेलं आहे, अशी टीका शिंदेंनी केली. तसेच, जनता कामाच्या जोरावर मतदान करते, नावावर नाही असा टोलाही ठाकरे बंधुंना लगावला.
अमित शाहांची देखील घेतली भेट
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाच्या इतिहासात सलग 2,258 दिवस सेवा देणारे अमित शाह पहिले गृहमंत्री ठरले. यानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की 370 कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री आहेत. सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या. एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा युतीला 25 वर्षे पूर्ण झाली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीएला भक्कम पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून यश मिळालं, त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, असेही शिंदेंनी सांगितले.