सांगली : शिवसेना कधी दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार देखील निवडून आले आहेत. केंद्राचे सरकार राज्याचे पालक असायला पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत ना चा पाढा वाचत असेल तरीही दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेलीय, कुणामुळे कोमात गेली हे पाहिले पाहिजे. यातून देशाला बाहेर काढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, नवीन मिळालेले सहकारी मजबूत आहेत. आमचा संघ उत्तम आहे, संघ म्हणजे टीम, नको तो वाद नको असे म्हणत त्यांनी संघाला टोला लगावला.

ते म्हणाले की, दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य दाम देणं गरजेचं आहे. पशु धन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करतोय. आम्ही पालकत्वाची भूमिका कधीही सोडणार नाही. उद्योगपतींना राज्यातच गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. माझा संघ उत्तम आहे. हे सरकार सूड काढणारं नाही, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, शेतकरी सर्वात महत्वाचे आहेत. शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आता पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. सहकार क्षेत्र आधीही मरू देणार नाही, पण शेतकऱ्याचं हित सर्वात आधी ठेवलं पाहिजे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. 2 लाखावरील देखील शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असेही ते म्हणाले.

यावेळी जयंत पाटील यांची स्तुती करताना ते म्हणाले की, जयंत राव तुम्ही सगळे कार्यक्रमच करून टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचे भाषण मन देऊन ऐकतो. जयंतराव बोलताना आपल्याला वाटते आपले कौतुक करतात. गुदगुल्या होतात पण घरी गेल्यावर कळते की त्यांच्या भाषणाने आपले ओरबडे निघतात. जयंतरावांनी ही तहसील कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी चालू पणा करत स्वतः अर्थमंत्री असताना मोठा निधी या इमारतीसाठी मंजूर केला. कारण पुन्हा आपले सरकार येईल हे त्यांना वाटत नव्हते, अशी फिरकीही त्यांनी घेतली.