मी भाग्यवान आहे, जे विरोधात होते ते मित्रपक्ष झाले, जे मित्रपक्ष होते ते विरोधी पक्षात आले, असेही ते म्हणाले. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपला परिचय आधी हाती आला असता तर बरं झालं असतं. आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात काय बोललो हे सांगण्याची पद्धत नाही. आमची तशी संस्कृती नाही. अनेक वर्ष आपण सोबत आहोत. सभागृहात लावलेल्या महापुरुषांच्या तसविरींकडून आपण प्रेरणा घ्यायची. त्या फक्त प्रतिमा नाहीत तर ते विचार आहेत, असे ठाकरे म्हणाले. इथं यायला भाग्य असावं लागतं. मी भाग्याने इथं आलोय. मी इथं येईन असं मी कधीही बोललो नव्हतो, तरीही मी इथं आलो. आपण नवीन काहीतरी करू, असे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांनी केली. तो कोरा करायचाच आहे. सातबारा कोरा केला नाही तर आपण जनतेचे गुन्हेगार ठरू. मला शेतकऱ्याला चिंतामुक्त करायचं आहे. सगळे दिग्गज सोबत आहेत. सगळं काम पूर्ण करू, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, देवेंद्रजी तुमची माझी मैत्री आहे. देवेंद्रजी आम्ही तुमच्यासारख्या मित्रांकडून मी खूप काही शिकलेलो आहोत. तुमची आणि माझी मैत्री आम्ही कुठेही लपवलेली नाही. तुमची माझी मैत्री आहे आणि त्यात कधीही अंतर येणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी माझा एक मित्र मुख्यमंत्री झालाय याचा आम्हाला आनंद झाला. गेल्या पाच वर्षात आम्ही एकदाही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या कुठल्याही कामाच्या आड आम्ही आलो नाही. माझी माझ्या सगळ्या सदस्यांना सक्त ताकीद होती की कपट कारस्थान करायचं नाही, काळोखात काही करायचं नाही, मध्यरात्रीची खलबतं करायची नाही, माझा मित्र समोर विरोधी पक्षात बसला आहे. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता,असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. भाजपचे विधिमंडळ गटनेते असलेल्या फडणवीस यांचेच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आल्याने त्यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेते म्ह्णून करण्यात आली.
संबंधित बातम्या