Money Saving Tips: प्रत्येक व्यक्तीची आयुष्य जगताना काही स्वप्नं असतात आणि ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक जण अथक प्रयत्न करत असतो. आपलं मोठं घर असावं, चांगली नोकरी असावी, बायको-मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पगार हवा, असं प्रत्येकाला वाटतं. भविष्यासाठीही प्रत्येकजण पैशाची बचत (Money Saving) करत असतो. आपल्या लाखो रुपये सेव्ह करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लोटावा लागतो, पण अमेरिकेत एक अशी मुलगी आहे, जिने वयाच्या 31 व्या वर्षी 12 कोटी रुपयांचं सेव्हिंग केलं आहे. इतक्या पैशांत (Money) ती तिचं पुढचं आयुष्य आरामात काढू शकते आणि म्हणूनच ती केवळ 35 वर्षांपर्यंतच काम करुन पुढे रिटायरमेंट घेणार आहे.


नेमकी कोण आहे ही तरुणी?


द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं नाव कॅटी असं आहे. कॅटीचं इन्स्टाग्रामवर ‘मिलेनिअल मनी हनी’ नावाने अकाऊंट आहे, ज्यावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती या अकाऊंटवर पैशाची बचत कशी करावी? याच्या टिप्स सांगत असते.


कधीपासून करते पैशांची बचत?


जेव्हा कॅटी 20 वर्षांची होती, तेव्हा ती इतर तरुण मुलींप्रमाणेच पार्टी करण्याचे, मौजमज्जा करण्याचे विचार करायची. तिला आरामदायी आयुष्य जगण्यासाठी पैसे खर्च करणं आवडायचं. पण जसजशी ती मोठी होत गेली तसतसे तिला बचतीचे (Saving) फायदे समजले आणि ती पैसे वाचवून स्वत:चं भविष्य चांगलं बनवू शकते हे तिला समजलं आणि तिने सेव्हिंगला सुरुवात केली.


कॅटीने 26 वर्षांच्या वयात पैशांची बचत करायला सुरुवात केली. तिला FIRE (Financial Independence Retire Early) बद्दल माहिती मिळाली. कॅटीला तिचा वार्षिक खर्च 30 लाखांपर्यंत होत असल्याचं समजलं, तिने हे सर्व पैसे सेव्ह केले  आणि FIRE या प्लॅनद्वारे ही अमाऊंट दुप्पट केली. कॅटीने असं करत वयाच्या 31 व्या वर्षी 12 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. या दरम्यान कॅटीने पैशांची सेव्हिंग करण्यासाठी 5 टिप्स देखील सांगितल्या, त्यावर एक नजर टाकूया.


कॅटीने सांगितले बचतीचे 5 मार्ग


1. अनावश्यक खर्च थांबवा


बचत सुरू करताना अनावश्यक खर्च कमी करणं आवश्यक असल्याचं कॅटी म्हणाली. आधी ती जिम मेंबरशिप, पार्लर, मेकअपवर हजारो रुपये खर्च करायची, पण नंतर तिने या गोष्टींवर पैसे खर्च न करण्याचं ठरवलं. कॅटी आता फक्त जीवनावश्यक गोष्टी खरेदी करते आणि बाकीच्या पैशांची बचत करते.


2. जितकी जास्त गुंतवणूक, तितका फायदा


पैशांची बचत करण्यासाठी गुंतवणूक केलेली कधीही योग्य असल्याचं कॅटी म्हणते. पैसे अकाऊंटमध्ये असेच ठेवण्यापेक्षा गुंतवणूक केल्यास ती रक्कम वाढत असल्याचं कॅटी म्हणते.


3. जास्त पगार मिळेल अशा ठिकाणी काम करा


तुमच्या कामासाठी जी कंपनी चांगला मोबदला देते तिथे काम करण्याचा सल्ला कॅटीने दिला. सतत नोकरी बदलत राहणं कधीही चांगलं, असं कॅटी म्हणाली. कॅटी आधी एका जाहिरात एजन्सीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती. मग तिने जॉब चेंज केला आणि टेक कंपनीत काम करू लागली. यानंतर तिचा पगार वाढला.


4. भाडं देणं टाळा


स्वतंत्र जीवन जगण्यासाठी तरुणाई आपल्या घरापासून दूर राहते. नोकरीसाठी मुलं मोठ्या शहरात स्थलांतरित होतात आणि तिथेच भाड्याने घर घेऊन राहू लागतात, यावेळी तरुणाईचे पैसे भाडं भरण्यात खर्च होतात. पण ही गोष्ट टाळावी, असं कॅटी म्हणते. कठीण काळात कॅटीनेही भाड्याचं घर सोडलं आणि ती आई-वडिलांच्या घरी राहू लागली.


5. आनंदाने करा बचत


अधिक बचत करण्यासाठी आनंदाकडे दुर्लक्ष करु नये, असंही कॅटी म्हणाली. कॅटी एकूण उत्पन्नाचा 80 टक्के भाग बचत करते आणि उरलेले पैसे ती मित्रांसोबत वेळ घालवताना खर्च करते. त्यामुळे हसत-खेळत आणि आनंदाने बचत करणं देखील महत्त्वाचं असल्याचं कॅटी म्हणते.


हेही वाचा:


टीव्ही पाहून आणि 3 तास झोपून लाखो रुपये कमावते ही महिला; म्हणते, 'ही' जगातील सर्वोत्तम नोकरी