Automatic Smart Dosa Maker : तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला अगदी छोट्या गोष्टींपासून ते अगदी मोठ्या कामांमध्ये मदत करते. ऑफीस असो वा घर प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानामुळे सोपी झाली आहे. घरातील किचनमध्येही मिक्सर, कुकर, डिश वॉशर यांसारख्या गोष्टींमुळे काम फारच सुकर होते. सँडविच मेकरसारख्या गोष्टी तर रोजच्या वापरातील आहेत. मात्र तुम्ही कधी डोसा प्रिंट करणाऱ्या मशीनचा विचार केला आहे का? बहुतेक नसेलच पण एका कंपनीने ही कल्पना सत्यात उतरवली आहे. एका कंपनीनं बाजारात 'डोसा प्रिंटर' आणला आहे. हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. हा प्रिंटर पाहून तुम्हीही थक्क व्हालं.


डोसा बनवणारा हा प्रिंटर चेन्नईमधील 'इवोशेफ' (Evoshef) कंपनीनं तयार केला आहे. या कंपनीनं प्रिंटरला डोसा प्रिंटर नाव दिलं आहे. या मशीनमध्ये डोसा बनवणं फार सोपं आहे. तुम्हाला फक्त डोसा प्रिंटरमध्ये डोशाचं पिठं टाकावं लागेल. यानंतर अगदी काही सेकंदात कुरकुरीत डोसा तयार होईल. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डोशाची जाडी आणि कुरकुरीतपणा ठरवून त्यानुसार डोसा तयार करु शकता. व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की डोसा प्रिंटरमध्ये डोसा तयार करणं किती सोपं आहे.






हा डोसा प्रिंटर ऑनलाईन उपलब्ध असून त्याची किंमत 15999 इतकी आहे. या डोसा प्रिंटरचा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटवर @NaanSamantha या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक मिलियनहून अधिक व्हूयज मिळाले आहेत. काही युजर्सना डोसा प्रिंटरची कल्पना फारच आवडली आहे. तर काही युजर्सना डोसा प्रिंटर आवडलेला नाही. 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा


एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की हा वायफळ शोध आहे. डोसा बनवण्यापेक्षा डोशाचं पिठं तयार करणं जास्त मेहनतीचं काम आहे.






दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, उगाच टीका करणं थांबवा. मी एकटा राहतो. मला डोसा आवडतो, पण बनवता येत नाही. माझ्यासाठी हे फायदेशीर आहे.









तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, काही पण बोला पण मूळ पद्धतीने डोसा बनवल्यावर येणारी चव या प्रिंटरमधील डोशाला येणार नाही.