Flight Window Fact : विमानातून प्रवास करणे फारच रोमांचक असते. हजारो फूट उंचीवर आकाशात प्रवास करणे अनेकांचं स्वप्न असते. जर तुम्ही विमान प्रवास केला असेल, तर त्याची बनावट, रंग आणि आकार अशा वेगवेगळ्या गोष्टींवर तुमची नजर पडलीच असेल. ट्रेन, बस किंवा विमानातील प्रवास असो अनेकांची इच्छा असते, ती म्हणजे विंडो सीटची (Window Seat) विमानात विंडो सीटसाठी अनेक जण जास्त पैसेही मोजायला तयार असतात. बहुतेक जण विमानातील तिकीट बूक करताना विंडो सीटला प्राधान्य देतात. पण विंडो सीट उपलब्ध नसेल, तर मग तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागतो.


विमान प्रवासामध्ये तुमची सीट कोणतीही असो, तुमची नजर खिडकीकडे नक्कीच जातो. यावेळी तुम्ही कधी विमानातील खिडकीच्या आकाराकडे लक्ष दिले आहे की? इतर सर्व वाहनांच्या खिडक्या चौकोनी किंवा आयताकृती असतात. विमानातील खिडकी साधारणपणे अंडाकृती आकाराची असते. हा आकार फक्त डिझाईन म्हणून देण्यात आलेला नाही तर, त्यामागेही एक कारण आहे. विमानाची खिडकी अंडाकृती म्हणजे साधारण गोलाकार आकाराची का असते यामागचं कारण जाणून घ्या


'या' कारणामुळे विमानाच्या खिडक्या गोलाकार असतात


विमानाच्या खिडक्या पूर्णपणे गोलाकार नसतात, परंतु साधारणपणे विमानाच्या खिडक्या अंडाकृती आकारात असतात. विमानाच्या खिडकीला टोक नसतात. यामागचे कारण म्हणजे चौकोनी आकाराची खिडकी वाऱ्याचा दाब सहन करत नाही आणि पटकन तडकते. याउलट गोल आकाराची खिडकी वाऱ्याचा दाब सहन करते आणि खिडकी वक्र असल्यामुळे काचेला तडा जात नाही. 


जेव्हा विमान आकाशात असते तेव्हा विमानाच्या आतील आणि बाहेरील असा हवेचा दाब दोन्ही बाजूंनी असतो. हा दाब सतत बदलत राहतो, म्हणूनच विमानाला गोल खिडक्या असतात. गोल खिडक्या असल्यामुळे विमान जास्त उंचावर असताना हवेच्या दाबामुळे खिडकीची काच फुटण्याचाधोका अधिक असतो. चौकोनी खिडकीमध्ये टोकांवर दाब वाढतो आणि खिडकीची काच तडकते, पण गोलाकार खिडकीच्या बाबतील हा दाब समांतर वाटला जातो आणि खिडकीची काच तडकत नाही.  


विमानाच्या खिडक्यांचा आकार आधी 'असा' होता


पूर्वी विमानात चौकोनी खिडक्या असायच्या. पूर्वी विमानाचा वेग कमी होता आणि विमान जास्त उंचीवर उडवली जात नव्हती. यामुळे त्यांच्यामध्ये जास्त इंधन वापरले जायचे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने विमानाचा वेग वाढवण्याची गरज भासू लागली. त्यामुळे कंपन्यांनी विमानाचा वेग वाढवला. विमानाचा वेग वाढल्यामुळे विमानाच्या आतील आणि बाहेरील हवेचा दाव संतुलित ठेवण्यासाठी खिडक्यांचा चौकोनी आकार बदलून गोलाकार करावा लागला. यामुळे खिडक्या जास्त वेगाने वाऱ्याचा दाब सहन करू शकतात आणि त्या तुटण्याचा धोका कमी असतो.