इटली : ओव्हरस्पीडिंग (Overspeeding) आणि दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे (Drunk Drive) जगभरात दररोज अनेक अपघात होत असतात. या अपघातांमध्ये (Accident) अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो.


सतत घडणारे विचित्र अपघातांचे सर्व प्रकार पाहूनही काही अतिशहाणे लोक त्यांच्या कृत्यावर आळा घालत नाहीत आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. ते केवळ स्वत:चा जीव धोक्यात घालत नाहीत, तर रस्त्यावरुन चालणाऱ्या इतर लोकांच्या जीवाशीही खेळतात. असाच काहीसा प्रकार इटलीमध्ये (Italy) घडला आहे. इटलीमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने 17 वर्षांच्या मुलाचा बळी घेतला.


नेमकं काय घडलं?


इटलीत राहणारा डेव्हिड पवन हा आपल्याच धुंदीत स्कूटर चालवत होता. पुढे जाऊन असा काही भयानक प्रकार घडणार आहे याचा अंदाज डेव्हिडला नव्हता. डेव्हिड आपल्या लेनमध्ये शिस्तीत स्कूटर चालवत असताना पोलीस अधिकाऱ्याच्या कारने त्याला मागून जोरदार धडक दिली, डेव्हिड स्कूटरसहित खाली कोसळला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रस्त्यातच त्याचा रक्तस्त्राव सुरु झाला. हा अपघात इतका गंभीर होता की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डेव्हिडचा जागीच मृत्यू झाला.


पालकांचा धक्कादायक खुलासा


सॅम्युअल सेनो असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्याला पेसे येथील घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दारुच्या नशेत असलेल्या पोलिसावर डेव्हिडच्या हत्येप्रकरणी खटला प्रलंबित आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, सॅम्युअल दारुच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्यामुळेच हा अपघात झाला, ज्यात डेव्हिड या मुलाचा बळी गेला. ही दुर्घटना 8 मे 2022 ची आहे. मात्र, आता या घटनेबाबत डेव्हिडच्या पालकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.


रस्त्यावरील रक्त साफ केल्याचं पाठवलं बिल


डेव्हिडच्या आई-वडिलांनी तब्बल एक वर्षानंतर असा खुलासा केला की, ज्या फूटपाथवर डेव्हिडचा मृत्यू झाला, तिथे खूप रक्त सांडलं होतं. त्या रक्ताच्या साफसफाईसाठी डेव्हिडच्या पालकांना 16,200 (£157) रुपयांचं बिल पाठवण्यात आलं. सुरुवातीला त्यांना वाटलं की, कदाचित कुणीतरी चुकीने आपल्या हे बिल पाठवलं आहे, कुणीतरी गंमतीत हे बिल पाठवलं असावं, असं त्यांना वाटलं. पण हा विनोद नव्हता.


'...अन्यथा दंड वाढवण्यात येईल'


हे बिल त्यांना डेव्हिडचं रस्त्यावर सांडलेलं रक्त साफ करण्याच्या खर्चाखातर पाठवण्यात आलं होतं. यात प्रशासनाने त्यांना इशारा देखील दिला की, लवकरात लवकर बिलाची रक्कम न भरल्यास नंतर तो दंड वाढवण्यात येईल. ही फार धक्कादायक आणि अचंबित करणारी गोष्ट होती, कारण डेव्हिडचे पालक आधीच आपला मुलगा गमावल्याच्या दु:खातून सावरले नव्हते.


हेही वाचा:


GK: चिनी सैनिकांना 'या' पदार्थावर आहे बंदी; मग शी जिनपिंग त्यांच्या सैन्याला कोणत्या प्रकारचं अन्न देतात?