Guinness World Record : एका सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, एक नोकरी करणारा व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात जवळपास 12 कंपन्या बदलतो. उत्तम पद आणि पगारातील वाढ ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात एक अशी व्यक्ती आहे ज्याने आपल्या आयुष्यातील तब्बल 84 वर्ष फक्त एका कंपनीत काम केलं आहे. या व्यक्तीने आपल्या कारकिर्दीत कधीही कंपनी बदलली नाही. एकूण 84 वर्ष एकाच कंपनीत काम करून या व्यक्तीने जागतिक विक्रम केला आहे. ही व्यक्ती कोण आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.  


वॉल्टर ऑर्थमन यांनी विक्रम केला


100 वर्षांचे वॉल्टर ऑर्थमन हे ब्राझीलचे रहिवासी आहेत. वॉल्टर ऑर्थमन (Walter Orthmann) यांनी आपल्या 84 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कंपनी बदलली नाही. या कामगिरीबद्दल वॉल्टर यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत 100 वर्षांचे असूनही वॉल्टर कसे काम करू शकले हे जाणून घेऊयात. 


वयाच्या 15 व्या वर्षी करिअरची सुरुवात 


वॉल्टरचा यांचा जन्म दक्षिण ब्राझीलमधील सांता कॅटरिना येथील ब्रुस्क शहरात झाला. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली आणि 84 वर्षांपासून रेनोक्सव्यू या कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये केले. आत्ताही ते या ठिकाणी काम करत आहेत. वॉल्टर यांनी या कंपनीत फ्लोर कर्मचारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते येथे एॅडमिन झाले आणि त्यानंतर सेल्स मॅनेजर म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. वॉल्टर म्हणतात की, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आपुलकी असली पाहिजे. ते पुढे सांगतात की, त्यांनी पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने आपले काम केले आहे.


वयाच्या 100 व्या वर्षीही नोकरी सोडली नाही


वॉल्टर यांचे वय 100 च्या जवळपास आहे. एवढ्या वाढत्या वयातही त्यांनी ना नोकरी सोडली ना शारीरिकदृष्ट्या कमजोर झाले. यावर वॉल्टर म्हणतात की, ते नेहमी स्वतःला फिट ठेवतात. यासाठी ते रोज स्ट्रेचिंग करतात आणि आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात. आपल्या आहाराशी संबंधित माहिती देताना वॉल्टर सांगतात की, ज्या पदार्थांमुळे शरीराला त्रास होतो असे पदार्थ मी खाणे टाळतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉल्टर त्यांचा आहार आणि व्यायामाचे नियम काटेकोरपणे पाळतात ते कधी चुकवत नाहीत.


महत्वाच्या बातम्या : 


Brain-Eating Amoeba: काय सांगता? थेट मेंदूच्या पेशी नष्ट करतोय 'ब्रेन इटिंग अमिबा'; 'या' देशात पहिल्या रुग्णाची नोंद