Viral Video: मेट्रोमधील विचित्र पराक्रमांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात, मग ती दिल्ली मेट्रो (Delhi Metro) असो किंवा नागपूर मेट्रो... चित्रविचित्र घटनांमुळे मेट्रोतील व्हायरल व्हिडीओंची नेहमीच चर्चा असते. मेट्रोमध्ये चालणाऱ्या अश्लील कृत्यांचे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, यातील अनेक प्रकार हे दिल्ली मेट्रोत घडणारेच असतात. पण यावेळी बंगळुरु मेट्रोमधील एक गजब प्रकार समोर आला आहे.
नियमांचं उल्लंघन करुन बंगळुरू मेट्रोमध्ये एका व्यक्तीने मंच्युरियन खाण्याची चूक केली. ही चूक त्याला इतकी महागात पडली की बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (BMRCL) त्याच्यावर कारवाई केली.
नेमकं घडलं काय?
तुम्ही जर मेट्रोने प्रवास केला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की, मेट्रोमध्ये कोणतेही पदार्थ खाण्यास आणि पेय पिण्यास बंदी आहे. अशा आशयाच्या सूचना मेट्रोच्या प्रत्येक डब्यात लावलेल्या असतात. काही वेळा या सूचना मेट्रोमध्ये बसताच स्पीकरद्वारे कानावरही पडतात. असं असतानाही काही दिवसांपुर्वी बंगळुरुतील एका व्यक्तीने मेट्रोमध्ये बसून मंच्युरियन खाण्याचं नाही ते धाडस केलं. समोर बसलेल्या एकाने या व्यक्तीचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
मेट्रोमध्ये बसून मंच्युरियन खाणं पडलं महागात
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करताच अगदी काही क्षणांत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीला चांगलंच झापलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर मेट्रो प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेत कारवाईचा बडगा उचलला. मेट्रो नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळुरुतील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, इतकंच नाही तर त्याला 500 रुपयांचा दंड देखील बसला.
मित्रांनी समजावून देखील ऐकलं नाही
मेट्रोमध्ये या व्यक्तीसोबत असलेले त्याचे मित्र त्याला आधीच बजावत होते. मेट्रोमध्ये काही खाऊ नकोस, असं त्यांनी सांगितलं होतं. तरीही या व्यक्तीने त्याच्या मित्रांचं ऐकलं नाही आणि मज्जा घेऊन मंच्युरियन खात राहिला. व्हिडीओमध्ये दिसतं की, या व्यक्तीचे मित्र त्याला बजावत असताना हा व्यक्ती फक्त हसत आहे आणि त्याचं खाणं सुरू ठेवत आहे. या व्यक्तीची वागणूक पाहून सोशल मीडियावरील लोकांचाही राग अनावर झाला.
व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीविरोधात जयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेट्रो नियमांचं उल्लंघन केल्यामुळे व्यक्तीकडून दंडही आकारण्यात आला. दंडाव्यतिरिक्त, या व्यक्तीकडून पुन्हा असं करणार नसल्याचंही पोलिसांनी लिहून घेतलं.
हेही वाचा:
VIDEO: आवडीने फ्रूट केक खाताय? फॅक्टरीतील 'हा' व्हिडीओ पाहून खाण्याआधी कराल 10 वेळा विचार