कराची: पेशावरच्या एनसीएस विद्यापीठातील व्हायरल होत असलेल्या एका विद्यार्थीनीच्या डान्स व्हिडीओ प्रकरणी (Viral Dance Video) आता पाकिस्तानच्या खैबर मेडिकल विद्यापीठाने (The Khyber Medical University) नोटीस बजावली आहे. 'अत्यंत अनैतिक आणि बेजबाबदार असं वर्तन' अशा पद्धतीचा शेरा या नोटीसमध्ये मारण्यात आला असून यावर तात्काळ उत्तर द्यायचे निर्देश दिले आहेत. तसं न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) एनसीएस विद्यापीठामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी एका विद्यार्थीनीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पेशावरच्या एनसीएस विद्यापीठामध्ये (NCS University System) तीन दिवसांच्या हुनार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी थर्टिन इव्हेंट प्लॅनर्सकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एका विद्यार्थीनीने केलेल्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या विद्यार्थीनीने काळ्या रंगाचे टाईट फिटिंग कपडे परिधान केले होते. त्यावरुन सोशल मिडीयावर टीकेची झोड उठत असून अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी युवतींनी अशा प्रकारच्या कपड्यांचा वापर करु नये अशा कमेंट्स करण्यात येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनंतर आता खैबर मेडिकल विद्यापीठाने या खासगी विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. अशा प्रकारच्या अनैतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या परिसरात का करण्यात आलं असा सवाल यामध्ये विचारण्यात आला आहे. तसेच घडलेल्या या प्रकारावर तात्काळ उत्तर देण्यात यावं असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात युवती डान्स करत होती त्या स्टेजवर खैबर मेडिकल विद्यापीठाचं नाव आणि लोगो लावण्यात आलं होतं. यालाच विद्यापीठाने आक्षेप घेत ही गोष्ट अस्वीकाहार्य असल्याचा शेरा मारलाय. जर यावर उत्तर मिळालं नाही तर एनसीएस विद्यापीठाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असं या नोटिसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातमी :